सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातार्याचे भाग्य विधाते, माजी सहकारमंत्री श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृती दिनानिमीत्त रविवार दि. 4 रोजी सायंकाळी 6 वाजता गांधी मैदान येथे ख्यातनाम आणि तरुण तडफदार शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्या भावगीत, भक्तीगीत व नाट्यगितांचा सुश्राव्य कार्यक्रम होणार आहे.
स्व. भाऊसाहेब महाराच्यांच्या पुण्यतिथीनिमीत्त सातारकरांना भारतातील प्रख्यात गायक कै. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहूल देशपांडे यांच्या कार्यक्रमाने सुश्राव्य अशा शास्त्रीय संगीताची सफर घडणार आहे. कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा सक्षमपणे चालवणार्या राहूल देशपांडे यांनी कट्यार काळजात घुसली, संगीत सौभद्र, संगीत मानपमान यासह असंख्य नाटक, चित्रपटांकसाठी गायन केले आहे. अगदी तरुण शास्त्रीय गायक म्हणून नावलौकिक असलेल्या राहूल देशपांडे यांना त्यांच्या गायनासाठी विविध पुरस्कारही मिळाले आहेत. राजवाडा येथील गांधी मैदानावर रविवारी सायंकाळी 6 वाजता स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित सुश्राव्य संगीतमय अभिवादनपर कार्यक्रमाचा लाभ सातारकरांनी घ्यावा असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीदिनानिमीत्त शाहुनगर- शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी सकाळी 9.30 वाजता अजिंक्य उद्योग समुहाच्यावतीने स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण व पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. भरतगाव येथील भैरवनाथ सामाजिक विकास संस्थेच्यावतीने अभिवादन कार्यक्रम होणार आहे. सातारा तालुक्यातील विविध गावांमधील सहकारी संस्थांमध्ये अभिवादन कार्यक्रम, ठिकठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम, खाऊ वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत.
0 Comments