सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी : चितळी ता. खटाव येथील शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या दोन ऊस टोळी मुकादमांना वडूज पोलीसांनी जेरबंद केले.
याप्रकरणी चितळी ता खटाव गावचे शेतकरी गणपत भगवान पवार व धर्मराज आबासो पवार यांनी फिर्याद दिली होती.
आरोपी मच्छिंद्र शिवदास माने रा भूम ता भूम जि धाराशिव व सचिन भानुदास जाधव रा कोळेगांव ता माळशिरस जि सोलापूर यांनी सन २०२३ मध्ये आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी १२ कोयते असे २४ ऊस तोडणी मजुर कोयत्यांची १ टोळी देतो असे सांगून तसेच तुम्हाला आणखी ऊसतोड कामगार पुरवितो असे आमिष दाखवून त्यांचेकडून रोख रक्कम व बँक आर टी जी द्वारे एकूण १२,७०,०००/- रूपये घेवून शेतकऱ्यांना ऊसतोड मजुर न पुरविता तसेच त्यांचेकडून घेतलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केलेबाबत वडूज पोलीस ठाणे येथे दिनांक ०५/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांतील दोन्ही आरोपींचा गुन्हा दाखल झालेपासून त्यांचा राहणेचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता. सदर दोन्ही आरोपी हे सतत मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस होत नव्हते. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनवणे यांनी सदर आरोपींचे गावी गोपनीय बातमीदार तयार करून सदर आरोपींची माहीती काढली असता सदर आरोपी हे दिनांक २१/०७/२०२५ रोजी गावी धार्मीक कार्यक्रमासाठी येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी वडूज पोलीस ठाणेकडील हवालदार नानासाहेब कारंडे, अमोल चव्हाण, नाईक प्रविण सानप व वरिष्ठ हवालदार बापू शिंदे एक टीम तपासकामी भूम ता भूम व कोळेगांव ता माळशिरस येथे रवाना केली. त्याप्रमाणे सदर पोलीस टीमने सापळा लावून सदर दोन्ही आरोपी यांना शिताफिने पकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्हयांचे तपासकामी अटक करण्यात आली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक निरीक्षक विक्रांत पाटील, हवालदार नानासाहेब कारंडे, हवालदार अमोल चव्हाण, आनंदा गंबरे, नाईक प्रविण सानप, वरिष्ठ हवलदार प्रदिप भोसले, अजित काळेल, बापू शिंदे, संदीप खाडे, प्रियंका सजगणे यांनी केली .
0 Comments