वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.पै.भगतने तमाम कुस्ती शौकिनांची मने जिंकली होती. कुस्ती निकालात जरी किरण उपविजेता ठरला तरी खऱ्या अर्थाने किरण कुस्ती शौकिनाचा विजयी पैलवान असल्याची भावना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी किरणच्या जन्मगावी मोही ता.माण येथिल भव्य नगरी सत्कार व जाहीर सभेत व्यक्त केलीे.
याप्रसंगी पै.किरणची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तर धावपटू ललिता बाबर हिचे स्वागत करण्यात आले. नागरी सत्कारालासभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अध्यक्ष पंढरीनाथ पगारे, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, जिल्हा परिषद सदस्या सोनालीताई पोळ, जिल्हा नियोजन सदस्य गोविंदराव शिंदे, पै. किरणचे सर्वकुटुंबीय, इतर पैलवान व कुस्तीशौकिन बहुसंख्येने उपस्थित होते.
सभापती रामराजे म्हणाले, किरण भगत आणि धावपटू ललिता बाबर देवदत्ताची देणगी लाभली असून त्यांच्या अंगातील कलेमुळे भारताचे नाव जगाच्या पाठीवर जाणार आहे. आम्ही राजकारणी मंडळी आहोत माञ तुमच्या मदतीमध्ये राजकारण केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
किरण भगत म्हणाले, गावक-यांनी सत्कार करून टाकलेली चांदीच्या गदेची जबाबदारी भविष्यामध्ये आपण समर्थपणे पेलणार असल्याची ग्वाही दिली.
मोही गावक-यांची अशीच स्थाप पाठीवर राहिली तर मोहीचे नव्हे तर भारताचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवू असा विश्वास ललिता बाबर यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र शासन खेळाडूंसाठी अनेक उपाययोजना राबवित आहे. तरुणांनी त्यासाठी खेळात पुढे यावे, अशी अपेक्षाही व्यक्ती केली.

0 Comments