फलटण/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कमिन्स कंपनीच्या सहाय्याने व अभ्यासाने पुढील 25 वर्षानंतर फलटण कस हवं याच नियोजन करत आहोत. एक किंवा दोन दिवस फलटणसाठी वार्डामध्ये फिरणं गरजेचं आहे परंतु माझा कामानिमित्त प्रवास वाढतच आहे त्यामुळे मला फलटणच्या नागरिकांना वेळ देता येत नाही, अशी खंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली. मला फलटणच्या नागरिकांना वेळ द्यायांची फार इच्छा आहे नागरिकांच्या काही सूचना असतील तर मला पाठवाव्यात अथवा मला भेटून सांगाव्यात. पुढील काळात अनेक कामे फलटणमध्ये होणार असून नागरिकांनी या कामांमुळे थोडा त्रास होईल परंतू नागरिकांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारत सरकार पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत शहरी विद्युत व्यवस्थेतील 13.47 किलोमीटर विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचे काम फलटण शहरात मंजूर झाले आहे. त्या कामाचा भूमिपूजन रामराजेंच्याहस्ते घडसोली मैदान फलटण लगत येथे संपन्न झाले त्या वेळी ते बोलत होते.
रामराजे म्हणाले, नागरिक स्मार्ट झाले तर निश्चित शहर स्मार्ट होईल. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांचा सहभाग नसला तर शहर स्वच्छ व स्मार्ट होऊच शकत नाही, त्यामुळे यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. पावसाळ्यात जोरात वाहनांर्या वार्यामुळे वीज वितरणमध्ये समस्या निर्माण होऊन वीज जाते परंतु हे विद्युत वाहिनी भूमिगत झाल्यानंतर हीच वीज बंद होण्याची समस्या बंद होईल.
प्रास्ताविक नगराध्यक्ष नीता नेवसे यांनी केले. या कामासाठी 3.44 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. ह्या अंतर्गत 132 केव्ही कोळकी उपकेंद्र ते पृथ्वी चौक, पृथ्वी चौक ते नारळी बाग, दत्त मंदिर ते गोसावी वस्ती, गोसावी वस्ती ते जिंती नाका या ठिकाणी सदर योजना राबविण्यात येणार आहे. वरील ठिकाणी सदर योजनेतून 13.47 किलोमीटर भूमिगत वाहिनीचे काम होणार आहे. यामुळे फलटण शहरातील नागरिकांना योग्य दाबाने अखंडीतपणे विद्युत पुरवठा होणार असून विद्युत अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे असे सौ. निताताई नेवसे यांनी कार्यक्रमावेळी सांगितले.
या वेळी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, कंत्राटदार संदीप मेनसे, नगरसेविका मधुबाला भोसले, विषय समितीचे सभापती प्रगती कापसे, वैशाली अहिवळे, दीपाली निंबाळकर, सुवर्णा खानविलकर, नगरसेवक अजय माळवे, जगन्नाथ कुंभार, वैशाली चोरमले, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, प्रतिभा धुमाळ,मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, बुरुंगले सर, दत्तात्रय गुजवंटे, प्रमोद निंबाळकर, राहुल निंबाळकर, फिरोज बागवान, व इतर पदाधिकारी आणि मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

0 Comments