Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी ‘राजे’ना ठेवणार हाताच्या अंतरावर, तिसर्‍या खासदारकीच्या तिकीटाची वाट बिकट, सुप्रिमो सत्काराला पण अन्य सरदारांचा सवतासुभा


विशेष प्रतिनिधी/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वर्षभरावर आलेल्या निवडणुका आणि वाढदिवसाच्या निमित्ताने झेडपीच्या मैदानावर खासदार उदयनराजेंनी शनिवारी मोठे शक्तीप्रदर्शन केले. या सत्कारासाठी राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार स्टेजवर आले खरे पण, राजधानी अन् बालेकिल्ल्यातील पवारांच्या सरदारांनी  मांडलेला सवतासुभा ठळकपणे अधोरेखित झाला. सत्कारप्रसंगी सर्वांना एका हारात गुंफण्याच्या वेळी मात्र पवारांनी हा हार गळ्यात न घेता हाताने लांब धरत राजेंना आता हाताच्या अंतरावर ठेवणार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे वर्षभरात सातारचे राजकारण ढवळून निघणार असून राजेंसाठी तिसर्‍या खासदारकीचे राष्ट्रवादीचे तिकीट बिकट असणार हे स्पष्ट झाले आहे.
प्रचंड जनमताच्या जोरावर खासदारकीवर आरूढ झालेले उदयनराजे हे बहुतांशवेळा राष्ट्रवादीला ‘असून अडचण, नसून खोळंबा’ आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील आमदारांमध्ये विरोधी भावना असली तरी ती प्रत्यक्ष कधीच समोर आली नाही. छुप्या पद्धतीने राजेंचा विरोध कायम राहिलेला आहे. पत्रिकेत आधी नसलेले व नंतर टाकण्यात आलेले रामराजेंचे नाव, सातार्‍यातील मनोमीलन तुटल्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीतील पराभव आणि सुरुचि बंगल्यावर झालेला राडा यामुळे शिवेंद्रराजेंसोबत निर्माण झालेला दुरावा आणि प्रत्येक मतदारसंघात असलेला राजेंचा स्वतंत्र गट यामुळे राष्ट्रवादी त्रस्त आहे. वाढदिवसाच्या सत्काराचे खलिते धाडून अनेकांना थेट फोन करूनही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी सातार्‍यात असून कार्यक्रमाला न जाणेच पसंत केले. शिवाय काही तास आधी सातार्‍यात आलेल्या पवारांसोबत बैठक घेत वाढदिवसाला न जाण्याचा सूर आळवला. तरीही पवार सत्कार कार्यक्रमाला आले. वाढदिवसाचा सोहळा असल्याने पवारांनीही सर्वांप्रमाणे उदयनराजेंचे कौतूक केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कारावेळी भल्यामोठ्या हारात गुंफण्याची वेळ आली तेव्हा पवारांनी हार गळ्यात न घालता हाताने समोर धरला. चंद्रकांत पाटलांनी दोन ते तीन वेळा पवारांना हार गळ्यात घालण्याची विनंती करूनही त्यांनी शेवटपर्यंत तो गळ्यात घातला नाही. तर संपूर्ण कार्यक्रमात पवार साहेबांनी खा. उदयनराजेंशी सवांद टाळण्याचा केलेला प्रयत्न अनेकांच्या नजरेतून सुटला नाही. पवार साहेबांची नाराजी लपून राहिली नसल्याचे अनेकांच्या लक्षात येवून हा विषय कार्यक्रमस्थळी चर्चेचा बनला.
यामुळे आगामी काळात पवारांची आणि राष्ट्रवादीची रणनीती काय असणार याचा अंदाज आला.

पवारांसमोर चुकांची कबुली

अजून निवडणुकांना जेवढा अवधी आहे तेवढ्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा मीच तास काटा अन् मीच मिनीट काटा, पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात असे म्हणत जनमताच्या रेट्यावर स्वार असलेले उदयनराजे म्हणजे ‘मैं खडा तो सरकार से बडा’, असे समीकरण सातार्‍यात आहे. तरीदेखील पवारांच्या देखत सत्ता असो नसो मला फरक नाही पडत असे सांगायलाही ते विसरले नाहीत. शिवाय कुठल्याही घराण्यात जन्माला आलो असलो तरी मी शेवटी एक माणूस आहे आणि घडल्या चुकांची कबुली देत मित्रत्वाच्या नात्याने मार्गदर्शन करा, असेही त्यांनी पवारांसमोर सांगितले.

मुख्यमंत्र्यांची गुगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे ‘मुक्त’ आहेत, अशी गुगली पवारांसमोर टाकली खरी. या गुगलीवर पवारांनी उत्तर दिले नाही. परंतु जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी हीच किंगमेकर आहे, याची जाण उदयनराजेंना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला राजेेंशिवाय पर्याय नाही हे दाखविण्यासाठीच हे शक्तीप्रदर्शन होते. शिवाय मुख्यमंत्र्यांना आणून तुम्ही नाही तर भाजपही मला लांबचे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

Post a Comment

0 Comments