Hot Posts

6/recent/ticker-posts

भरती रद्द ही सुरुवात... आणखी कारनामे बाहेर काढणार: आमदार जयकुमार गोरे


बोराटवाडी @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
जिल्हा मध्यवर्ती बँकेने चुकीच्या पध्दतीने केलेल्या नोकरभरती विरोधात मी आवाज उठविला होता. सभापती आणि सहा आमदारांची ताकद आणि दबाव असुनही अखेर सत्याचाच विजय झाला. नोकरभरतीतून  कोट्यवधींची माया जमवून राजकारण करणार्‍यांना न्यायव्यवस्थेने चपराक दिली आणि गोरगरिबांच्या खर्‍या अर्थाने पात्र असणार्‍या मुला, मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेचे दरवाजे पुन्हा उघडले असल्याची प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
राज्याच्या सहकार विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सातारा जिल्हा बँकेने राबविलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर दैनिक सत्य सह्याद्रीशी बोलताना आमदार गोरे  म्हणाले, बँकेत सेवक भरती करताना सत्ताधारी संचालक मंडळाने मनमानी कारभार केला होता. कोट्यवधींची माया गोळा करुन पैसे दिलेल्या परिक्षार्थींची निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. खर्‍या प्रामाणिक आणि पात्र परिक्षार्थींना डावलण्यात आले होते चुकीच्या सेवक भरती प्रक्रिये विरोधात मी विधीमंडळात तसेच  प्रसारमाध्यमांसमोर आवाज उठविला होता. मुख्यमंत्र्यांनी तसेच सहकार मंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र सत्ताधारी संचालक मंडळाने सभापती आणि इतरांची ताकद वापरुन चौकशीच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार  वरिष्ठ पातळीवरुन चौकशी झाल्यानंतर भरती प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने झाल्याचे समोर आले आणि सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी बँकेने केलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवेंद्रराजे कटपुतली

माझ्या आरोपांना उत्तर देताना मनाविरुद्ध कटपुतली झालेले बँकेचे चेअरमन नेहमीच  पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवायचे. जिल्हा बँकेतील ज्या संचालकांच्या खाजगी बँका आहेत त्या बँकांचे दिवाळे निघाले आहे. आपली जिल्हा बँकही त्या मार्गाने जाऊ नये म्हणून माझी लढाई सुरु आहे. मी बँकेची प्रतिष्ठा जपण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. बँकेच्या अनागोंदी कारभाराबाबतचे प्रलंबित असणारे निकाल लवकरच लागतील आणि संचालक मंडळ तुरुंगात जाईल. सीसीटीव्ही, संगणक सॉफ्टवेअर, नोकरभरती घोटाळ्यामुळे नाशिक बँक बरखास्त झाली. सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची कुकर्मे तर त्यापेक्षा भयानक आहेत. त्यामुळे शासनाला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. सभापतीपदाचा दबाव फार काळ काळ कामी येणार नाही. बँकेच्या नोकरभरतीत गोळा केलेला कोट्यवधींचा पैसा जि. प. निवडणूकीत वापरण्यात आला. नोकरभरती निवडणूकांच्या नंतर असती तर निवडणूकांमध्येही वेगळे चित्र दिसले असते.

सरकाळेंचा मोठा सहभाग, त्यांच्यावर फौजदारी खटला भरणार

चुकीच्या सेवक भरतीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांचाही मोठा सहभाग आहे. कुटुंबातील तसेच ओळखीच्या व्यक्तींना नोकरी देण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्यावरही लवकरच फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले. संबधीत यंत्रणेवरही गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझी लढाई सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी आहे. ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे. कार्यकारी मंडळाला  अधिकार नसताना मंजूर करण्यात आलेली कर्जप्रकरणेही लवकरच चव्हाट्यावर येणार आहेत. बँकेची मार्गदर्शक तत्वे आणि पोटनियम डावलून चाललेल्या कारभारचा लवकरच पर्दाफाश होईल असेही आ. गोरे यांनी शेवटी सांगितले.

पीएनबी सारखा घोटाळा होवू नये म्हणजे झाले

सातारा जिल्हा बँकेचा अनागोंदी कारभार आणि चुकीच्या सेवक भरतीविरोधात मी आवाज उठवला की चेअरमन थातुरमातुर स्पष्टीकरण देतात. आता तर अप्पर मुख्य सचिवांनी भरती प्रक्रिया रद्द केली आहे. आता नव्याने आणि पारदर्शीपणे सदर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आणखी काही उलटसुलट गोष्टी बँकेत घडत आहेत. पीएनबी सारखा महाघोटाळा आपल्या बँकेत होवू नये म्हणजे मिळवली असा टोलाही आ. गोरे यांनी ल्गावला.

भरती झालेल्यांचे भवितव्य अधांतरी

सातारा जिल्हा बँकेने 244 लिपिक आणि 132 शिपाई अशी एकूण 376 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. सदर प्रक्रिया वादात सापडूनही बँकेने निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देवून कामावर हजर करुन घेतले होते. आता सदर भरती प्रक्रियाच रद्द करण्याचे आदेश सहकार विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुन्हा भरती प्रक्रिया होणार असेल तर निवडण्यात आलेले उमेदवारांचे भवितव्य अधांतरी रहाणार आहे.

Post a Comment

0 Comments