Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा बँकेतील नोकर भरती रद्द, सहकार खात्याचा दणका


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बहुचर्चित नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. सहकार खात्याच्या अप्पर सचिवांनी 376 जागांसाठी झालेली नोकर भरती रद्द ठरवत ही प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याचे आदेश काढल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही भरती रद्द होण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी मोठा रेटा लावला होता. या निर्णयामुळे गोरेंनी समाधान व्यक्त केले असून राष्ट्रवादीच्या हाती असलेल्या जिल्हा बँकेला यामुळे मोठा दणका बसला आहे.

राजकीय आकसापोटी सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. गेल्या वर्षी 376 जागांसाठी  नोकर भरती झाली होती. बँकेचे संचालक व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी या नोकर भरतीच्या विरोधात उपोषणही केले होते. बोराटवाडीतील विकास उत्तम बोराटे व इतर अर्जदार युवकांनी उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरुद्ध धावही घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने या प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले होते. शिवाय पूर्वी राष्ट्रवादीत असलेले व नंतर भाजपवासी झालेले अनिल देसाई यांनीही सहकार मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी देखील सहकार आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
न्यायालयाच्या २७ जुलै च्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून बुधवारी अप्पर मुख्य सचिवांच्या सहीने आदेश काढला आहे. ‘सचोटी, पारदर्शकता, पावित्र्य अन् बँकेचे हित या सर्व बाबींचा विचार करून ही नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे या आदेशात म्हटले आहे.
या निर्णयाविरुद्ध योग्य ती दाद मागणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले असून या निर्णयामुळे भरती न होऊ शकलेल्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे. आता पुढील घडामोडींकडे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Post a Comment

0 Comments