Hot Posts

6/recent/ticker-posts

साता-यात सहाव्या मराठी भाषा पंधरवडयानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतीदिनाचा योग साधून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहुपुरी यांच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. यंदाचे सहावे वर्षे असून याहीवर्षी 27 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसापचे जिल्हा प्रतिनिधी आणि शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीचा भाषा पंधरवडा विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीला समर्पित करण्यात आला आहे.
सहाव्या मराठी भाषा पंधरवडयाचे उदघाटन मंगळवार27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक पद्मश्री कुमार केतकर यांच्याहस्ते होणार आहे.  यावेळी मराठी साहित्यातील समाजभान या विषयावर ते बोलणार आहेत. यावेळी मसाप पुणेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते,  माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम हे उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि. 4 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे हेमंत देसाई ऊर्फ बाबुमोशाय यांचे बदलती मराठी चित्रपटसृष्टी विषयावर व्याख्यान होणार आहे. जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण,नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. रविवार दि. 11 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे वंदना खरे व सहका-यांचा उजेडाशी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सातारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, सातारा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, माजी नगराध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडिक यांची प्रमुख उपस्थिती आहे.
बुधवार 14 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त, साहित्यिक, गीतकार राजन लाखे यांचे विंदा आणि त्यांची प्रतिभा या विषयावर व्याख्यान होणार आहे. . यावेळी सहाय्य्क धर्मादाय आयुक्त आय. के. सुर्यवंशी, मसाप, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, राजू गोडसे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार 17 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे मराठी भाषा पंधरवडाचा समारोप होणार असून. ज्येष्ठ पत्रकार रवि आमले यांचे प्रचार भान याविषयावर व्याख्यान होणार आहे.  यावेळी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, साविआचे सचिव अॅड. डी.जी.बनकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, मसाप जिल्हा प्रतिनिधी सोपानकाका चव्हाण, माजी नगरसेवक रवींद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या भाषा पंधरवडयाच्या सर्व कार्यक्रमास सातारकर साहित्यप्रेमींनी, मराठी भाषाप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, नदंकुमार सावंत, अॅड. चंद्रकांत बेबले, राजेश जोशी  आणि सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments