Ticker

6/recent/ticker-posts

भिडेगुरुजींच्या सन्मानार्थ राजधानी सातार्‍यात बुधवारी महामोर्चा, धारकर्‍यांसह समविचारी संघटनेच्या 25 हजार कार्यकर्त्यांचा सहभाग


सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेनंतर राज्यातील वातावरण कलुषित झाले आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने आरोप केले गेले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडेगुरुजी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या चुकीच्या प्रकारामुळे समाजमनात चीड निर्माण झाली आहे.हे गुन्हे मागे घ्यावेत व याप्रकरणात दडपलेले सत्य जगासमोर आणण्यासाठी भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राजधानी सातार्‍यात बुधवार दि. 28 रोजी महामोर्चाचे काढण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह केदार डोईफोडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रसिद्धी प्रमुख काशीनाथ शेलार, सहकार्यवाह सागर आंमले, संदीप जायगुडे, सातारा तालुका प्रमुख शुभम शिंदे यांची उपस्थिती होती. 
महामोर्चाबाबत अधिक माहिती देताना डोईफोडे म्हणाले, पुणे येथे झालेली एल्गार परिषद ही केवळ हट्टापोटी घेण्यात आली. यावेळी जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांनी युवकांची माथी भडकवली. त्यानंतरच कोरेगाव-भीमा प्रकरण घडवून आणले गेले.  एल्गार परिषदेला उपस्थित असलेल्या या नेत्यापैकी एकही जण भीमा-कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमाला का उपस्थित नव्हता असा सवालही श्री. डोईफोडे यांनी यावेळी केला. दरम्यान,  कोरेगाव-भीमा हे प्रकरण घडवून आणले गेले आहे. वास्तविक त्या दरम्यान भिडेगुरुजी हे धारातीर्थ मोहिमेच्या नियोजनामध्ये व्यस्त होते. तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींच्या अंत्ययात्रेला उपस्थित  होते आणि याचे सबळ पुरावे आहेत. असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने सातत्याने सरकारवर दबाव आणून गुन्हे करण्यास प्रवृत्त केले आहे. सदर घटना होत असताना भिडेगुरुजी व कोणतेही धारकरी संबंधित ठिकाणी नसताना त्यांची नावे गोवली गेली आहेत. 
सातार्‍यात बुधवारी 28 रोजी होणार्‍या महामोर्चामध्ये सर्व समविचारी संघटना सहभागी होणार असून सर्व हिंदु समाजातील नागरिकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी हे महामोर्चे काढण्यात येणार आहेत. सातार्‍यात होणार्‍या महामोर्चाला सकाळी 10 वाजता राजवाडा (गांधी मैदान) येथून सुरुवात होणार असून राजपथमार्गे कमानी हौद मार्गे मार्गामध्ये असणार्‍या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्‍या सभेने समारोप होणार आहे. 
या मोर्चाची नियमावली ठरवलेली असून त्या नियमावलीचे आचरण सहभागी होणारा प्रत्येक धारकरी करणार आहे. दरम्यान, पुणे येथे होणार्‍या महामोर्चात खासदार उदयनराजे  भोसले हे सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत जनसामान्यांचे जे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्याची भरपाई प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घ्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments