Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधानांना भेटणा-या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु – मुख्यमंत्र्यांची ग्वाही


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्हयाने चळवळ उभी केली आहे त्यामुळे त्या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बडोदे येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटेल असे जाहीर केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर शिष्टमंडळ भेटणार असल्याचे प्रसिध्द झाले होते. तथापि हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्हयाने पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा चार वर्षे धूळ खात पडलेला प्रस्ताव कॅबिनेट नोटपर्यंत नेण्यासाठी जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींनी वारंवार निवेदने, पंतप्रधाना कार्यालयाशी पत्रव्यवहार, दिल्लीत आंदोलन केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु. तसेच लवकरच शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जाईल अशी ग्वाही दिली.

या चर्चेवेळी मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, कविवर्य बा.सी.मर्ढेकर स्मारक समिती सदस्य हरिष पाटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पालिका भाजप गटनेते धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अॅड. विक्रम पवार, फिरोज पठाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments