परळी: पूर्ववैमनस्यातून कूस बुद्रुक येथील ३० हुन अधिक युवकाच्या टोळक्याने परळी येथील मोहन जांभळे यांच्या कुटुंबावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात सैन्यदलातील जवान अरुण जांभळे यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून यातील संशयित पाच आरोपींना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मोहन जांभळे यांच्या शनिवार दि. २४ रोजी साजरा होणाऱ्या ५१ व्या वाढदिवसात सायंकाळी ४ वाजता घडला आहे. या घटनेने परळी बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.
परळी येथील मोहन जांभळे यांचा मुलगा गौरव मोहन जांभळे याचे आणि कूस बुद्रुक येथील युवकांमध्ये काही महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती. यावरून अनेक वेळा शाब्दिक चकमखही घडली होती. वाद होणार हे नक्की होते पण कधी होईल हे सांगू शकत नव्हते. त्याला आज मुहूर्त लागला. आज शनिवार दि. २४ रोजी गौरव याचे वडील मोहन यांचा 51 व्या वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाहुणे मंडळीही आली होती. दुपारी ४ च्या सुमारास मंडप टाकून जेवणाची तयारी सुरू केली होती. यावेळी अचानक कूस बुद्रुक येथील सुमारे २५-३० जणांचे टोळके दुचाकी घेऊन तोंडाला सकार्प बांधून जांभळे यांच्या घरासमोर आले आणि आम्हाला गौरवला भेटायचे आहे. त्याला बोलवा असे सांगितले.
यावर आलेल्या युवकाच्या टोळक्याने धारधार शस्त्र आणि आणि दांडके काढली यावर नातेवाईक आणि ग्रामस्थ जमा झाले. यावेळी टोळक्याने गौरव याला मारण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या सैन्यदलातील मोहन जांभळे यांचा बंधू अरुण जांभळे यांच्यासह गौरव मोहन जांभळे आणि शेखर जांभळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यासह अन्यजन जखमी झाले आहेत. यातील काही जणांवर खासगी तर काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात हल्ला करणाऱ्या कूस बुद्रुक येथील तानाजी लोटेकर, आशितोष लोटेकर, शिवाजी लोटेकर व निलेश आणि ओंकार (पूर्ण नावे व पत्ता माहीत नाही) अशा पाच संशयितांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून धारधार शस्त्रास्त्रे व दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे हवलदार सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

0 Comments