सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: नगरपालिकेत झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या निवडीत दीपक पवार यांनी मनमानी करत पक्षासाठी कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तीस आर्थिक तडजोडीतून स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी दिली असल्याचा आरोप करत शहर कार्यकारिणीने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पदाधिकार्यांना विश्वासात न घेतल्याने सर्व राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कार्यकारिणी सदस्यांच्या सहयानिशी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सातारा पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत ज्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली आहे त्यांना स्वीकृत पदासाठी संधी न देता ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाचा विस्तार घरोघरी जावून केला आहे. सभासद वाढवले आहेत त्यांना संधी देण्याचे धोरण भाजप नेते व कोअर कमिटीचे असताना दीपक पवार यांच्या हट्टासाठी जे उमेदवार फक्त पालिका निवडणुकीपुरते पक्षात होते व नंतर पक्षाच्या बैठकीलाही हजर राहिलेले नाहीत अशा व्यक्तीस आर्थिक तडजोडीतून संधी देण्यात आल्याची चर्चा कार्यकत्यात आहे. शहर कार्यकारिणीला विश्वासात न घेतल्याने दीपक पवार यांच्या मनमानी कारभारावर आमची नाराजी असून आम्ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत. याचे परिणाम पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत भोगावे लागतील.
पत्रकावर शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांच्यासह सरचिटणीस जयदीप ठुसे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राजेंद्र पवार, उपाध्यक्ष अप्पा कोरे, निलेश कदम, प्रदीप मोरे, चिटणीस रवी आपटे, कोषाध्यक्ष संदीप मेळाट, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल कांबळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

0 Comments