कोरेगावात 8 लाखांच्या साड्या चोरीस भर बाजारपेठेतील दुकानावर चोरट्यांचा डल्ला - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 12, 2018

कोरेगावात 8 लाखांच्या साड्या चोरीस भर बाजारपेठेतील दुकानावर चोरट्यांचा डल्ला



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कोरेगाव : शहरातील मेनरोडवर असलेल्या कल्पराज कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या पद्मावती सारीज या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने 7 लाख 81 हजार रुपयांच्या किंमती साड्या व 11 हजारांची रोकड लांबवली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
प्रवीण मोतीचंद ओसवाल यांचे पद्मावती सारीज दुकान आहे.  शनिवारी रात्री 8 वाजता दुकान बंद करुन ओसवाल हे घरी गेले होते. रविवारी सकाळी 8 च्या  सुमारास दुकानाच्या शेजारी असलेल्या सुनील पवार यांनी प्रवीण ओसवाल यांच्या मोबाईलवर कॉल करुन, तुमच्या दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. ओसवाल हे लगेचच दुकानात पोहोचले. शटरच्या पट्ट्या तोडलेल्या होत्या तर शटर उचकटलेले होते. त्यांनी शटर उघडून आत पाहिल्यावर दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. 
पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, उपनिरीक्षक डी. डी. चौगुले, अविनाश राठोड व संतोष मिसळे यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेतली. दुकानाची पाहणी केल्यानंतर आजूबाजूच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीचे रात्रीच्या वेळीचे फुटेज तपासले. त्यामध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसून आले.  उपनिरीक्षक अविनाश राठोड, हवालदार राजू बागवान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार उदयसिंह जाधव, गणेश कापरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वान पथकाला देखील चोरट्याचा माग काढता आला नाही. 
चोरट्याने चार लाख रुपयांच्या दोनशे लाछा साड्या, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 60 पैठणी साड्या, 1 लाख रुपयांच्या शंभर माहेश्वरी साड्या, पन्नास हजार रुपयांच्या पन्नास पाऊच पॅकिंग साड्या, 40 हजार रुपयांचे पन्नास रेडिमेड वनपीस ड्रेस, 32 हजार रुपयांच्या 40 काठापदराच्या साड्या, 30 हजार रुपयांच्या 15 वर्क साड्या, 12 हजार रुपयांच्या 15 इरकल साड्या व दोन्ही कॅश काऊंटरमधील ड्राव्हरमधून 11 हजार रुपये रोख असा एकूण ऐवज चोरुन नेला आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment