औंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक, सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 22, 2018

औंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक, सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम

औंध :-औंध संस्थानचे अधिपती, थोर चित्रकार, जागतिक किर्तीच्या श्री भवानी वस्तूचित्रसंग्रहालयाचे संस्थापक ,विविध कलाकार ,उद्योजकांना राजाश्रय देणारे तसेच लोकशाहीचे पुरस्कर्ते,सूर्यनमस्काराचे प्रणेते द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त येथील मूळपीठ डोंगरावरील श्रीभवानी वस्तू व चित्रसंग्रहालय परिसरातील बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या समाधीस्थळ बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.


औंध संस्थानच्या इतिहासात मानाचे पान ठरलेल्या कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांनी  1868 ते 1951या आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केले यामध्ये त्यांनी आपल्या संस्थानात विविध कलाकारांना राजाश्रय दिला तसेच 1898 मध्ये औंध येथे श्रीयमाई श्रीनिवास हायस्कूल सुरू केले. संस्थानातील 72गावातील 85 शाळांमध्ये त्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीस विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटावे म्हणून सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराचा उपक्रम राबविला तसेच औंध संस्थानच्या कुंडल,आटपाडी या गावांमध्ये सूर्यदेवता मंदिरे उभारली .थोर उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना किर्लोस्करवाडी येथे उद्योग उभारणीसाठी तसेच ओगले यांना ओगलेवाडी येथे काच कारखाना काढण्यासाठी जागा दिल्या. औंध येथे स्वतः संस्थानिक असूनही लोकांना लोकशाहीचे  महत्त्व कळावे म्हणून 1916साली ग्रामपंचायत स्थापन केली तसेच देशामध्ये परदेशात फिरुन विविध पेंटिंग्ज, दुर्मिळ कलाकृती ,शिल्पवस्तू,विविध प्रकारची दुर्मिळ हत्यारे,चंदनी वस्तू गोळा करून 1937-38साली मूळपीठ डोंगराच्या मध्यावर श्रीभवानी वस्तू संग्रहालय उभारले तसेच 18हजार विविध दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ, हस्तलिखिते यांचा संग्रह करून त्याठिकाणी ग्रंथालय उभारणी केली आहे.


त्याचबरोबर बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी औंध गावातील   श्रीयमाई देवीचे सभामंडपाचे काम त्यांनी केले.  तसेच स्वतंत्र जेल संकल्पना त्याकाळी त्यांनी आटपाडी येथील तुरूंगात राबविली व गुन्हेगारांचे चांगल्या कामातून पुनर्वसन केले. त्यावरून दो आँखे बारा हात हा सिनेमा साकारला गेला. त्यांनी कीर्तनांमधून ही समाज प्रबोधन केले. त्याकाळी क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांना राजाश्रय दिला.


त्यांच्या मुळे ग.दी.माडगूळकर, साने गुरुजी, के.ना.वाटवे,बँ.आप्पासाहेब पंत, म.गो.पाठक, माधवराव सातवळेकर, भगवंतराव पंतप्रतिनिधी,माधव कुलकर्णी, शंतनुराव किर्लोस्कर,शंकरराव खरात हे दिग्गज उद्योजक,लेखक, विचारवंत, सिने दिग्दर्शक , चित्रकार यांनी औंध येथे शिक्षण घेतले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बुधवारी सकाळी मूळपीठ डोंगरावर सुरूवातीस  सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत तसेच सकाळी 9.30 वाजता औंधच्या सरपंच नंदिनी इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते समाधीस्थळाचे पूजन करून कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. यावेळी उपसरपंच सचिन शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यतवर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर कै.श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या जीवन कार्याची माहिती विश्वस्त हणमंतराव शिंदे,प्रा.प्रमोद राऊत,गजानन कुंभार देणार आहेत तसेच त्यानंतर कोल्हापूर येथील चित्रकार शेलार हे व्यक्ती चित्र साकारणार आहेत तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.






No comments:

Post a Comment