औंध :-त्रिमली ता.खटाव येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी पांडुरंग येवले वय 35 यांनी ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जबाजारीपणाला कंटाळून नांदोशी तलावाजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, त्रिमली येथील विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व शेतकरी शिवाजी येवले यांनी नांदोशी व त्रिमली गावानजीक असणाऱ्या तलावाच्या पश्चिमेकडील बाजूला असणाऱ्या मधली वाट नावचे शिवाराजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती सकाळी त्रिमली ग्रामस्थांना ,युवकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर शिवाजी येवले यांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले त्यानंतर औंध पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता शिवाजी येवले यांच्या जवळ तीन लाख रुपये कर्ज असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली .त्यामुळे त्यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. वयाच्या 35व्यावर्षी शिवाजी यांनी आत्महत्या केल्याने त्रिमली, औंध परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
ऐन दुष्काळी परिस्थितीत शिवाजी येवले यांनी केलेल्या आत्महत्येमुळे आता तरी शासन खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करणार की नाही असा संतप्त सवाल दुष्काळी जनतेतून केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी त्रिमली येथील ग्रामस्थांनी केली आहे व शिवाजी येवले यांच्या निराधार पत्नीस त्वरीत मदत दिली जावी अशी मागणी केली आहे. दरम्यान सदर घटनेची नोंद औंंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
No comments:
Post a Comment