जोशी, मराठे, हुसेन यांच्या वादन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध, औंधला 78 व्या शास्त्रीय संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ व्हिडीओसह बातमी - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 29, 2018

जोशी, मराठे, हुसेन यांच्या वादन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध, औंधला 78 व्या शास्त्रीय संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ व्हिडीओसह बातमी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध : येथील दत्त मंदिरासमोरील औंध कलामंदिरामध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रसन्न, चैतन्यमय, मनोहरी वातावरणात  शिवानंद स्वामी प्रतिष्ठानच्या 78व्या औंध संगीत महोत्सवास प्रारंभ झाला.
यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संगीत महोत्सवास सुरुवात करण्यात आली. सरपंच नंदिनी इंगळे, शिवानंद संगीत प्रतिष्ठानचे पं.अरुण कशाळकर,अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आ.प्रभाकर घार्गे म्हणाले, औंध गावास एक इतिहास व परंपरा आहे. शास्त्रीय संगीताचा वारसा मागील 78वर्षांपासून  जोशी कुटुंबीय जपत आहे तोच वारसा अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी यांनी पुढे नेला आहे. हा वारसा आणखी समूध्द करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी हा संगीत महोत्सव आणखी दैदिप्यमान करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात प्रसिद्ध व्हायोलिन वादक असगर हुसेन यांच्या वादनाने  झाली. त्यांनी व्हायोलिन वादनाचे धडे उस्ताद अन्वर हुसेनखान,गौहर अली खान,झहुर अहमद खान व अन्य दिग्गजांकडे त्यांनी वादनाचे धडे घेतले.
त्यांना विविध प्रकारचे उच्च सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.  सुमारे  दीड तास त्यांनी आपल्या व्हायोलिन वादनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यांनी चारताल की सवारी हया 11 मात्रेच्या तालात राग जौनपुरी सादर केला. त्यानंतर पहाडी रागातील दादरा तालात धून सादर केली.यावेळी त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांनी केली.
त्यानंतर पं.गजाननबुवा जोशी यांची नात पल्लवी जोशी यांनी आपली गायनसेवा सादर केली.
पल्लवी जोशी यांनी मागील सात ते आठ वर्षापासून औंध संगीत महोत्सवाचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. हे करीत असताना त्यांनी आपल्या गायनाकडे कधी ही दुर्लक्ष केले नाही.
त्यांना संगीताचा समूध्द वारसा पं. अंतुबुवा जोशी व पं. गजानन बुवा जोशी यांच्या कडून लाभला आहे.
तसेच वडील मनोहर जोशी, डॉ. सुचेता बिडकर यांच्या कडून त्यांनी संगीत शिक्षण घेतले आहे. भारत सरकारच्या शिष्यवृत्ती सह अनेक पुरस्कार ही त्यांनी मिळविले आहेत.
यावेळी त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध गायनाने रसिकश्रोत्यांच्या मनावर गारूड घातले. यावेळी त्यांनी राग बिभास मध्ये बडा ख्याल ‘अलबेलो मेरो ताल’ तिलवाडामध्ये व ताल त्रिताल मध्ये कस्कुवरवा जाईल हमरा ही द्रुत बंदिश सादर केली तसेच हिंडोलबहार रागात रुपक तालातील मायिरी आज ही बंदीश सादर केली.
त्यांना तबल्यावर स्वप्नील भिसे यांनी साथ संगत केली तर हार्मोनियम वर चैतन्य कुंटे यांची साथ लाभली.पहिल्या सत्राची सांगता भाग्येश मराठे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गौडसारंग रागात रब ठाडाहा विलंबित तीनतालातील बडाख्याल सादर केला.त्याला जोड मांडी खबरी ही द्रुत त्रिताल मधील बंदिश सादर केली.
त्यानंतर राग शुध्द सारंग रागात झपतालातील ख्वाजा दिन दुनिया ही बंदिश  व त्याला जोड द्रुत त्रिताल मधील पं.अनंत जोशी यांची रचना दिन दिन आनंद हि बंदिश सादर करून पहिल्या सत्राची सांगता केली. सायंकाळी उशिरा दुसर्‍या सत्रास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन सुनील पवार, केदार पेंडुरकर यांनी केले. औंध संगीत महोत्सवास कोकण, पुणे,मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल तसेच देशाच्या विविध भागातून रसिक श्रोते, कलाकार मोठ्या संख्येने आले आहेत.

No comments:

Post a Comment