औंध :- येथील स्वामी शिवानंद संगीत प्रतीष्ठान यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या औध संगीत महोत्सव यंदा सोमवार दि २९ रोजी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. यावर्षी देखील या संगीत महोत्सवासाठी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. संगीत महोत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
येथील स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अश्र्विन वद्य पंचमीला संगीत क्षेत्रातील अध्यात्म गुरू स्वामी शिवानंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक गायनाचार्य पं अनंत बुवा जोशी आणि पं. गजानन बुवा जोशी या पिता पुत्रांनी या आगळ्यावेगळ्या संगीत महोत्सवाचा १९४० साली पाया घातला आहे. गेली ७७ वर्षे औंध सारख्या ग्रामीण भागात हा संगीत महोत्सव अव्याहतपणे सुरू आहे. यंदा महोत्सवाचे ७८ वे वर्ष आहे. जोशी घराण्यातील तिसऱ्या पिढीने आता महोत्सवाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ग्रामीण भागातील संगीत रसिकांच्या दृष्टीने संपूर्ण मोफत असलेला हा शास्त्रीय संगीत महोत्सव एक पर्वणीच असते. त्यामुळे सर्वांनाच या महोत्सवाची उत्सुकता लागलेली असते.
यंदा देखील या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकार आपली सेवा या संगीत महोत्सवात पेश करणार आहेत. सोमवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या शुभहस्ते, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सौ नंदिनी इंगळे उपसरपंच सचिन शिंदे, आदींच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्रात असगर हुसेन यांच्या व्हायोलिन वादनाने सुरवात होणार आहे. त्यानंतर पं गजानन बुवा जोशी यांची नात पल्लवी जोशी यांचे गायन होणार आहे. तसेच प्रो. ओजेश प्रतापसिंग यांच्या गायनाने पहिल्या सत्राची सांगता होणार आहे. दुपारी ४ वाजता स्वप्नील भिसे यांच्या एकल तबला वादनाने दुसऱ्या सत्राची सुरवात होणार आहे. यानंतर रियाझ स्मरणिकेचे प्रकाशन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते डॉ प्रविण भोळे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक पं अरुण कशाळकर यांचे गायन होणार आहे.श्रीमती आभा वाम्बूरकर यांच्या कथ्थक नृत्याने हे सत्र संपणार आहे.रात्री दहा वाजता गजानन बुवा जोशी यांची नात अपूर्वा गोखले यांच्या गायनाने तिसऱ्या सत्राचा आरंभ केला जाणार आहे.त्यानंतर जागतिक किर्तीचे सतारवादक पं नयन घोष यांचे सतार वादन होणार आहे. किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक कैवल्यकुमार यांचे गायन होईल.पंडीत शुभदा पराडकर यांच्या गायनाने य या महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवात चिन्मय कोल्हटकर, डॉ चैतन्य कुंटे हे संवादीनीवर, तसेच प्रवीण करकरे, स्वप्नील घोष, ईषाण घोष हे तबला साथ करणार आहेत. स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या वतीने या संगीत महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. श्रीयमाईदेवीच्या पायथ्याशी असलेल्या औध कलामंदिर व दत्त मंदिर परिसरात स्वच्छतेचे काम चालू आहे.
No comments:
Post a Comment