माण तालुक्यात दसर्‍याला साखर कारखान्याची पायाभरणी, रणजितसिंह देशमुख : कारखान्याचे शेअर्स घेण्यास प्रारंभ - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 1, 2018

माण तालुक्यात दसर्‍याला साखर कारखान्याची पायाभरणी, रणजितसिंह देशमुख : कारखान्याचे शेअर्स घेण्यास प्रारंभ




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध :  खटाव तालुक्यातील हरणाई सूतगिरणी व माण तालुक्यातील प्रबोधनकार मागासवर्गीय सूतगिरणी प्रकल्प मोठ्या संघर्षातून उभे करत शेकडो हातांना रोजगार मिळवून दिला आहे. आज या दोन्ही प्रकल्पांनी मोठे यश मिळवले आहे.या प्रकल्पानंतर स्व. दादांचे ( धैर्यशील देशमुख ) स्वप्न साकारण्यासाठी व दुष्काळी भागातल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी माण तालुक्यात शुगर ग्रीन हा पहिला साखर कारखाना उभारला जात असून दसर्‍याच्या मूहुर्तावर याची पायाभरणी केली जाणार असल्याचे प्रतिपादन सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांनी केले आहे.
पिंगळी बु.ता.माण येथील प्रबोधनकार मागासवर्गीय  सहकारी सूतगिरणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, आजपर्यंत अनेक राजकारण्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारत जनतेला फसवण्याचे उद्योग केले आहेत. सूतगिरणीच्या दोन्ही प्रकल्पांची उभारणी करताना अनेकांनी अनंत अडचणी निर्माण केल्या.पण यावर मात करत आज दोन्ही प्रकल्प नावारूपाला आणले आहेत.
हरणाई सूतगिरणीवर आज एक रूपयांचेही कर्ज नाही.माण- खटावमध्ये सव्वापाच लाख टन उसाचे उत्पादन काढले जाते. माण-खटावच्या जनतेसाठी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे आशीर्वाद घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्धार केला होता. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच कारखाना सुरू होणार आहे. हा कारखाना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त राहणार असून यातून सल्फरलेस साखर काढण्यात येणार आहे. राज्यातला एक आदर्श कारखाना उभारण्याचे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवले आहे.दसर्‍याला शुभारंभ झाल्यानंतर नऊ महिन्यात हा कारखाना सुरू होणार आहे. कारखान्याचे शेअर्स जमा करण्यास प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment