सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खंडाळा : शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने कारचालकाला एक वर्ष नऊ महिने सक्तमजुरी व साडे तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.अभिजित सुरेश करळे ( वय ३४, रा. गोखले वृंदावन ,चिंचवड ,पुणे ) असे दोषी ठरलेल्या कारचालकाचे नाव आहे.
सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे कारचालक अभिजित सुरेश करळे हा कार ( क्र.एमएच - १४-बीएफ-९०९ ) भरधाव वेगाने घेऊन निघाला होता.दरम्यान,संबंधित कार शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका कंपनीसमोर आली असता महामार्ग ओलांडणाऱ्या अनिस निरज बीके ( वय ५ वर्ष , रा.शिंदेवाडी ता.खंडाळा ) याला कारने जोरदार धडक दिली. यावेळी अनिस बीके याला घटनास्थळी उपस्थितांनी शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला कारचालक अभिजित करळे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रविंद्र कदम यांनी करत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गोरख बोबडे यांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. यावेळी खंडाळा येथील न्यायालयासमोर सुनावणी होत सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित बी.चव्हाण यांनी कारचालक अभिजित करळे याला दोषी ठरवले. यावेळी न्यायाधीश अजित बी.चव्हाण यांनी अभिजित करळे याला दोषी ठरवत सहा महिने एक हजार रुपये दंड व दंड न भरल्र्यास १५ दिवस कैद , ३ महिने ,५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस कैद , एक वर्ष व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद अशी एक वर्ष नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस हवालदार रवींद्र कदम, पोलीस हवालदार सुनील गायकवाड यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment