पाटण -कृषी अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांना अखेर तब्बल सव्वा महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला, दरम्यान विक्रमबाबा पाटणकर गुन्हा दाखल झाल्यापासून जवळजवळ सव्वा महिना भूमिगत होते ,
मल्हारपेठ येथे पाटण तालूका कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटे यांच्या श्रीमुखात लगावून शासकीय कार्यक्रम बंद पाडला होता. याप्रकरणी विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर पाटण पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर विक्रमबाबा पाटणकर हे आजपर्यंत परागंदाच होते. जवळपास सव्वा माहिन्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिश अनुजा प्रभू देसाई यांनी मंजूर केला. विक्रमबाबानां मुंबई हाय कोर्टाचा जामिन मंजुर झालेचे समजताच पाटण तालुक्यात बाबा समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आणि पेढे वाटूण जल्लोष साजरा केला.
याबाबत अधिक माहिती अशी, पाटण तालुक्यात पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या मागणीसाठी विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटी आंदोलन करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यातच गुरूवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाटण तालुका कृषी विभागामार्फत मल्हारपेठ (कदमवाडी) येथील श्री जोतिबा मंगल कार्यालयात हुमणी कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. डॉ. पांडूरंग मोहिते, कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर, रिचफिल्ड फर्टीलायझर्स प्रा. लि. नाशिकचे एरिया सेल्स मॅनेजर अमर पवार यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२.२० च्या सुमारास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर हे त्यांचे दोन कार्यकर्त्यांसह मंगल कार्यालयात आले. त्यांनी माईक हातात घेवून तालुक्यात दुष्काळ पडला असताना शासकीय कार्यक्रमास कसे काय उपस्थित राहता अशी शेतकऱ्यांना विचारणा करत तीन महिने ओल्या दुष्काळाने नुकसान झालेल्या कृषी खात्याने शेती पिकांचे पंचनामे का केले नाहीत? अशी विचारणा तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटे यांना केली यावेळी प्रविण अवटे यांची उर्मट भाषा आल्याने विक्रमबाबा यांनी सर्वांसमक्ष आवटे यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर पाटण पोलिसात शासकीय कार्यक्रम बंद पाडून अडथळा निर्माण करणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आजपर्यंत विक्रमबाबा पाटणकर हे परागंदाच होते.
तद्नंतर पाटणकर यांनी कराडच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याठिकाणीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. पुन्हा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्याठिकाणी तिसऱ्या तारखेला त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होवून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिश अनुजा प्रभू देसाई यांनी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. अखेर तब्बल सव्वा महिन्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने विक्रमबाबा पाटणकर समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.
बाबा समर्थकांचा जल्लोष
शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांना तब्बल सव्वा महिन्यानंतर अटकपूर्व जामिन मंजूर झाला. त्यामुळे विक्रमबाबा समर्थकांनी पाटणमधील झेंडाचौकात फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
No comments:
Post a Comment