पाटणपासून कोयनानगर पर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम बंद पाडू - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 8, 2018

पाटणपासून कोयनानगर पर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम बंद पाडू


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

पाटण : कराड-चिपळूण  राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे  काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून  रूंदीकरणासाठी जमीन भूसंपादनासंदर्भात किती जागा संपादित होणार आहे. भूंपादनाचा मोबदला  बाधित शेतकऱ्यांना मिळणार की नाही याबाबत या मार्गालगतच्या शेत जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना कसलीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रशासन व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सबंधित शेतकऱ्यांची बैठक घेवून वरील  प्रश्नांची माहिती द्यावी . अन्यथा  पाटणपासून कोयनानगर पर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम बंद पाडू, असा इशारा कोयना विभागातील ११ गावातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी पाटण, तहसीलदार पाटण, पोलीस अधिकारी पाटण, कोयनानगर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.


या  निवेदनात म्हटले आहे, कराड-चिपळूण राज्यमार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठमोठी झाडे मुळासकट काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याप्रमाणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी  रस्त्या लगतच्या दोन्ही बाजूकडील जमीन आवश्यक आहे असे समजते आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्याकडील पत्रानुसार कराड-चिपळूण रस्त्यालगत असणाऱ्या काळोली, ताकमडे, येराड, शिरळ, मारूल तर्फ पाटण, वाजेगाव, कराटे, गोजेगाव, वांझोळे, गोषटवाडी (धक्का), रासाटी आदी गावांमधील रस्त्याकडील शेतकऱ्यांना पाटण तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची नोटीस प्रसिध्द झाली आहे. सदर मोजणीच्या नोटीसीमध्ये संबंधित प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे सर्वे नंबर नमूद केले आहेत. मात्र संबंधित सर्वे नंबरच्या मूळ मालकांना मोेजणी खात्याकडून नोटीसा प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. 


त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर गावांमधील शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा करून भूसंपादनाची माहिती द्यावी.. तसेच भूसंपादनाबाबत आवश्यक असणाऱ्या जमिनींचा मोबदला देणार की नाही, अगर शेतकऱ्यांचे किती क्षेत्र सार्वजनिक कामासाठी लागणार आहे. त्या   बाबींचा  खुलासा शेतकऱ्यांना करावा. शेतकऱ्यांच्या  मागणीचा संबंधितांनी विचार केला नाही तर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करू देणार नाही.. शेतकऱ्यांचा संयम सुटून उद्रेक होण्याची वाट पाहू नये, असा इशाराही निवेदनाद्वारे शेवटी संबंधित गावातील  शेतकऱ्यांनी दिला आहे.


या निवेदनावर पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ  शेलार, बापूराव देवळेकर, राजेंद्र पाटणकर, युवराज साळुंखे, रामचंद्र साळुंखे, धनाजी पवार, शांताराम सूर्यवंशी, कोंडीबा सुर्यवंशी, दादासाहेब पवार, संपत किशोर गुरव, दिलीप पाटील,  यांच्यासह कोयना विभागातील ११ गावांमधील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment