औंध येथे बुधवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; दहा दिवस विविध कार्यक्रम - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

औंध येथे बुधवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; दहा दिवस विविध कार्यक्रम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


औंध : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी,श्री कराडदेवी,श्रीमूळपीठदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित बुधवार दिनांक 10 ते शुक्रवार दिनांक 19 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची अशी माहिती श्रीयमाई देवस्थानच्या  मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, सध्या औंध येथील राजवाड्यातील कराडदेवी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी मंदिर, मूळपीठ डोंगरावरील श्री मूळपीठदेवी मंदिरामध्ये व परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.  याठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, धार्मिक विधीची ही जय्यत तयारी सुरू आहे.

बुधवारी सकाळी 12 वाजता राजवाड्यामध्ये श्रीकराडदेवी मंदिरात पुण्याहवाचन केले जाणार आहे. त्यानंतर मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते कराडदेवीची मखरात स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री 8वाजता महानैवेद्य ,महाआरती,मंत्रपुष्पांजली हे कार्यक्रम होणार आहेत.               


गुरुवारी 11  ते सोमवार दिनांक 15 या कालावधी मध्ये नियमित सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली त्याचबरोबर नियमित गजाननबुवा कुरोलीकर यांचे रात्री कीर्तन होणार आहे. मंगळवारी 16 रोजी सकाळी 12 वाजता महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली  तसेच देवीच्या पाट्यापूजनाचा ओटी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच  मूळपीठ डोंगर व ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी मंदिरात ही देवीच्या ओटीभरणाचा कार्यक्रम होणार आहे.



बुधवार दिनांक 17  रोजी अष्टमी उत्सवानिमित  डोंगरावर देवीची यात्रा भरविली जाणार आहे. दुपारी देवीचे पूजन करून पालखीतून देवीची डोंगरावर मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी विविध देवतांना भेटी देऊन उपस्थित ग्रामस्थ, महिला,भाविकांना प्रसादाचे वाटप श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.



गुरुवारी 18 रोजी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमाबरोबर देवीची घट उत्थापना कार्यक्रमाबरोबर कुमार कुमारी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. राजवाडयातील शस्त्रपूजा केली जाणार आहे. त्यानंतर औंध येथील ग्रामस्थांना राजवाडयात दसरा उत्सवानिमित जेवण दिले जाणार आहे.



औंध गावातील श्रीयमाईदेवीच्या उत्सव मूर्तीचे विधिवतपणे पूजन करून वाद्यवृंदाची सलामी देऊन देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी निघणार असून अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवर, मानकर्‍यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. व त्यानंतर डब्बे लावून गोळीबार केला जाणार आहे. पालखी मिरवणूक परत मंदिर, राजवाडयात आल्यानंतर संस्थानच्या परंपरेनुसार दरबार भरविला जाणार असून यावेळी गवई गान,गुलाबपाणी,पानसुपारी देण्याचा तसेच दसर्यानिमित शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी मानकर्‍यांना बिदाग्या देऊन लळीताने या उत्सवाची सांगता होणार आहे. नियमित पौरोहित्यपठन गणेशशास्त्री इंगळे व वसंतराव देशपांडे करणार आहेत. डोंगरावर जाण्यासाठी व येण्यासाठी वडूज आगारामार्फत दोन मिनी बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment