उरमोडीचे पूर्ण पाणी खटाव-माणला मिळवून देणार डॉ. दिलीप येळगावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 8, 2018

उरमोडीचे पूर्ण पाणी खटाव-माणला मिळवून देणार डॉ. दिलीप येळगावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा:  आजपर्यंत सातारा जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इतरत्र पळवले गेले. ही बाब आताच्या मंत्र्यांना पटली असून विशेषत: उरमोडीचे सध्या मिळणारे पाणी हे अपूर्ण असून ते पूर्ण क्षमतेने खटावला मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.



ते म्हणाले, उरमोडी असं धरण आहे की ज्याला स्वत:ची वितरण व्यवस्था नाही. उरमोडीचे पाणी कण्हेर कॅनॉलमध्ये सोडले जाते. त्यानंतर ते आरफळ कॅनॉलमधून ते कोंबडवाडी येथे आणून लिफ्ट करून खटाव माणला दिले जाते. आरफळ कॅनॉल हा सांगलीला जातो. यातून कण्हेरचे कुठले, आरफळचे कुठले व उरमोडीचे कुठले हे समजत नाही. त्यामुळे त्यातून उरमोडीचे पाणी सांगलीला जात आहे. आज उरमोडीच्या पाण्याची वितरण व्यवस्था पूर्ण नसल्याने गांभीर्याने हा विषय घेतला नाही.



सध्या 4 पंपांमधून पाणी खटावला दिले जात आहे. ते 16 पंपातून येणे आवश्यक आहे. आरफळ आणि कण्हेर कॅनॉलची दूरवस्था झालेली आहे. 16 पंपातून पूर्ण क्षमतेने जेव्हा उरमोडीचे पाणी येईल तेव्हा हे कॅनॉल केव्हाही फुटू शकतात. त्यामुळे जे पुण्यात घडले, नागपूरमध्ये घडले ते घडू शकते. यापूर्वीही कण्हेर, आरफळ कॅनॉल फुटले आहेत.उरमोडी ही योजना सातारा तालुक्यातील काही भाग आणि खटाव-माण संपूर्ण एवढ्यासाठीच ही योजना आहेे. असं असताना आरफळ कॅनॉलमधून हे पाणी पळवले जात आहे. मध्यंतरी ही बाब जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब सांगितली तेव्हा त्यांनाही आश्‍चर्य वाटले. 


कण्हेर आणि आरफळची क्षमता वाढवणे शक्य नाही. कारण वर्षातून आठमाही हा कॅनॉल वाहत असतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती अथवा रुंदीकरण शक्य नाही. त्यामुळे वेगळी वितरण व्यवस्था करण्यासाठी कृष्णा नदीमध्ये आणखी एक टप्पा करून उरमोडीचे पाणी थेट वाठार किरोलीला आणावे हा एक पर्याय अथवा उरमोडी धरणातून थेट पाईपलाईन करून ते पाणी कोंबडवाडी येथे आणावे.  मी आमदार असताना ही वितरण व्यवस्था वेगळी करावी, अशी मागणी केली होती.  उरमोडीचे जे पाणी शासनाने दिले आहे ते संपूर्ण मिळेल अन्यथा कायम खटाव-माणवर अन्याय ठरेल. ही योजना केवळ मृगजळ ठरेल. आजही हे पाणी केवळ महिना, दीड महिना मिळते आणि तेही काही भागातच जाते. शासनाकडे अधिकृत मागणी केली आहे.  म्हणून काही करून येत्या पाच सहा महिन्यात हे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  वेळ पडली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाणार. पाणी खटाव-माणच्या हक्काचे आणि ते अन्य भागाकडे जाते हे कायमस्वरुपी होणारा अन्याय दूर करणार आहे. आणि आताच्या मंत्र्यांना हे पटले आहे, असेही ते म्हणाले.



No comments:

Post a Comment