फलटण येथे शेतकऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, बोगस बी विक्रीचा झाला पोलखोल ? - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 28, 2018

फलटण येथे शेतकऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, बोगस बी विक्रीचा झाला पोलखोल ?

शेतकरी गोरख लालासो सस्ते


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

फलटण :- मौजे निरगुडी तालुका फलटण येथील एका शेतकऱ्याने भेंडीची बि न उगवल्यामुळे विक्रेत्याकडे व कृषी अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने कृषी दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


उपविभागीय अधिकारी (प्रांत), तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल तक्रार अर्जानुसार व अन्यायग्रस्त शेतकरी यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार, मौजे निरगुडी येथील शेतकरी गोरख लालासो सस्ते यांनी दिनांक 12/10/ 2018 रोजी फलटण येथील चंद्रशेखर पवनलाल दोशी (वाकडमाने) यांच्या बी बियाणे दुकानातून भेंडीचे बी दीड किलो खरेदी केले होते. त्यानंतर सदर शेतकऱ्याने सदर बी टोकण पद्धतीने व नंतर पाणी देऊन लागवड केली परंतु अनेक दिवस होऊनही भेंडीचे बी उगवले नाही म्हणून सदर शेतकऱ्याने दुकानदार चंद्रशेखर पवनलाल दोशी (वाकडमाने) यांच्याशी दुकानात प्रत्यक्ष भेटून भेंडीचे बी उगवले नाही असे सांगितले व संबधित कंपनीस कळवून प्रत्यक्ष शेतात भेट देऊन झालेला मजुरी खर्च व झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली परंतु सदर दुकानदार यांनी "तुला काय करायचे ते कर कुणाकडे जायचे तयाकडे जा मी तुला भरपाई देणार नाही" असे सांगितले. 


यावर दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सस्ते यांनी तालुका कृषी अधिकारी फलटण कार्यालय यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अर्ज वाचून "डोईफोडे साहेब यांची मीटिंग सुरू आहे, आम्ही अर्ज घेऊ शकणार नाही" असे सांगितले यावर सस्ते यांनी विनंती करूनही त्याचा अर्ज स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला यानंतर सस्ते यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी धनंजय महामुलकर यांना फोनवर संपर्क केला व सर्व घडलेली हकीकत सांगितली. धनंजय महामुलकर ईतर पदाधिकारी यांच्यासमवेत तालुका कृषी अधिकारी फलटण येथे आले असता त्यांनी डोईफोडे यांची भेट घेतली व सदर शेतकऱ्यांची तक्रार अर्जानुसार कारवाई करण्याची विनंती केली. "तुला बी पावती व पिशवी द्यावी लागेल, इतर सर्व माहिती मला द्यावी लागेल ही फार मोठी प्रक्रिया आहे कंपनीचा माणूस येणार व भेट देऊन निर्णय घेणार नंतर कंपनी नुकसानभरपाई ठरवणार, तू केस केली तर तू टिकणार नाही" असा अजब सल्ला तालुका कृषी अधिकारी डोईफोडे साहेब यांनी शेतकऱ्यास दिला.


 यानंतर शेतकरी संघटनेने तक्रार अर्ज स्वीकारण्यास सांगितल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा अर्ज स्वीकारला गेला परंतु अर्जाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर दि 27 रोजी संबंधित शेतकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत चंद्रशेखर पवनलाल दोशी (वाकडमाने) या दुकानदाराकडे गेले असता "तुला काय करायचे ते कर मी भरपाई देऊ शकत नाही" असे सांगितले असता अन्यायग्रस्त शेतकरी गोरख सस्ते यांनी दुकानदार यांच्याकडील कागद-पेन मागून घेऊन अचानक खिशात असणारी औषधाची बाटली काढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यानंतर उपस्थित लोकांनी सस्ते याच्या हातातील बाटली काढली व पुढील अनर्थ टळला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची बोगस बी बियाणे प्रकरणी याप्रकारे फसवणूक झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून याबाबत येणाऱ्या काही दिवसात अनेक तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विष प्राशन करून आत्महत्या करण्यास तालुका कृषी अधिकारी, श्रीराम कृषी भंडारचे मालक निंबाळकर असल्याचा मजकूर लिहला होता.


शेतकऱ्यास बोगस बी विक्री करणाऱ्या व शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दुकानदारावर व संबंधित अधिकारी व लोकांच्यावरती तत्काळ फसवणुकीचा व आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला या बाबत आंदोलन करण्यास भाग पाडू नये असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment