संविधानाचे रक्षण काळाची गरज"- विक्रमबाबा पाटणकर - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 27, 2018

संविधानाचे रक्षण काळाची गरज"- विक्रमबाबा पाटणकर


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

पाटण -: संविधान म्हणजे काय हे अजूनही बर्‍याच लोकांना माहीत नाही भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संविधान बदलण्याचे धाडस कोणत्याही पक्षाला शक्य नाही, देशाला सविधान मिळून 68 वर्षे झालीत पण  अकार्यक्षम शासनकत्यांमुळे सर्वसामान्याला आजही न्याय मिळत नाही, हा भारतीय संविधानासह महापुरुषांच्या विचारधारेचा अपमान आहे अशी खंत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी व्यक्त केली. पाटण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा. रविंद्र सोनावले, भारतीय जनता पार्टीचे पाटण तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दीपक माने, सामाजिक कार्यकर्ते विजय थोरवडे, यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी बोलताना विक्रमबाबा  म्हणाले, डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांना 395 कलमांचे संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेत या संविधानामुळे शोषित वंचित सामान्य घटकांना न्याय मिळाला. संविधानाचा लाभ घेऊन काही मंडळी उच्च पदावर नोकरी करत आहेत 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा संविधान दिनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमाला अशी नोकरदार मंडळी व शासकीय अधिकारी गैरहजर राहतात ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, आजचा संविधान दिन शासकीय कार्यालयात शाळा तसेच महाविद्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेत साजरा करणे गरजेचे आहे, तरच सर्वसामान्य नागरिकाला भारतीय संविधान व त्याचे महत्त्व समजेल, संविधान हे कोणा एका समाजासाठी नाही, ज्यांना संविधानामुळे आमच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्यांनी अगोदर भारतीय संविधान वाचले पाहिजे, भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे, संविधान जिवंत ठेवणे काळाची गरज आहे, सर्वांनी संविधानाचे जागृतपणे रक्षण करूया असे आवाहन शेवटी विक्रमबाबा पाटणकर यांनी केले, यावेळी प्राध्यापक रविंद्र सोनवले, प्राणलाल माने, विजय थोरवडे,दिपक माने, अनिल माने यांनी मनोगत व्यक्त केले, संतोष जगताप यांनी आभार मानले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच 26 11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास जेष्ठ कार्यकर्ते मधुकर गायकवाड यशवंत दाभाडे,  दीपक भोळे, नामदेव चव्हाण, आबा देवकांत, संजय कांबळे, अनिल माने, रोहन माने, यांच्या सह धम्म बांधव -भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment