सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
पाटण :- आ. शंभूराज देसाई मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तुम्ही भलत्याच गोष्टी बोलू लागल्यानं यातूनच तुमची पक्षनिष्ठा व नेत्यांचा तुमच्यावरील विश्वास स्पष्ट झाला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची येणार्या निवडणूकीत मदत मिळावी म्हणूनच त्यांच्या नावाचा गजर करून आमच्यात मतभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा तुमचा प्रयत्न न ओळखायला तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. जर मतदारसंघात खरोखरच कोट्यावधीचा विकास केला हे छातीठोकपणे सांगता तर मग अशी सहानुभूती मिळविण्याची दयनीय वेळ तुमच्यावर का आली ? असा प्रतिप्रश्न युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
या पत्रकात सत्यजीतसिंह पाटणकर पुढे म्हणाले,आ. देसाई जर तुम्ही खरोखरच एवढा मोठा विकास केला आहे ,तर मग येणाऱ्या निवडणुकीत येथील मतदार तुम्हाला पुन्हा पाडतील अशी भिती का वाटते ? याच भितीपोटी तुम्हाला जाईल त्या ठिकाणी आम्हा पितापुत्रांचा नामोल्लेख केल्याशिवाय चैन पडत नाही. जीथे तुम्ही जावून पाटणकरांची मापे काढता तिथे जाताना विक्रमसिंह पाटणकर यांनीच केलेल्या रस्त्यावरूनच जावे लागते याचा विचार करा. नेहरू उद्यानात गेलात, पवनचक्क्यांच्या रस्त्यांसह आदी ठिकाणी जाऊन तुम्ही आमची मापे काढता जर हे झालेच नसते तर ? याचा कधीतरी विचार करा. आमच्या साखर कारखान्याची चिंता तुम्ही अजीबात करू नका, तेवढा विश्वास आम्ही नक्कीच कमावला आहे व आमच्या ताब्यातील संस्था, प्रकल्पातून तो आम्ही सिद्धही करून दाखविला आहे.देसाई साखर कारखाना तुमच्या ताब्यात येवून अनेक वर्षे झाली तरी पुरक प्रकल्प तर सोडाच पण त्याची गाळप क्षमता अगदी शंभर ग्रॅमने तरी वाढवली का ? हे एकदा जाहीर करा. आणि प्रश्न राहिला त्या कारखान्यात तुम्हाला मिळालेल्या बहुमताचा यासाठी तुमचे कौतुक करावेच लागेल कारण मागच्या दाराने स्वतःच्या गटाचे बिगर ऊस उत्पादक हजारो सभासद करणे, आमच्या विचारांच्या सभासदांचे सभासदत्व जाणीवपूर्वक रद्द करणे, त्यांच्या वारसनोंदी न करणे ,यातूनच मिळालेले तुमचे मताधिक्य तुम्हालाच लखलाभ. यातून शेतकरी, कामगार व सभासदांचा काय फायदा केला ते जरा समोर आणा. हिम्मत असेल तर हे बिगर ऊस उत्पादक सभासद बाजूला काढा, राजकीय आकसातून व पराभवाच्या भितीपोटी आमचे कमी केलेले सभासद घेऊन वारसनोंदी करून या रिंगणात मग तुम्हाला तुमचे कर्तृत्व अनुभवायला मिळेल.
विक्रमसिंह पाटणकर यांना जनतेने लोकप्रतिनिधीत्व दिले होते. सन 1983 ते 2004 व पुन्हा 2009 ते 2014 अशा तब्बल सहा वेळा आमदार व एकवेळ मंत्री होण्याची संधी त्यांना पक्षाने व जनतेनी दिली .त्यावेळी त्यांनी समाजकारण केले तुमच्यासारखी जागोजागी जावून मापे काढण्यात वेळ घालवला नाही. तुमचा कोट्यावधी रूपयांचा विकासाचा दावा असेल तर जनता बहुमताने निवडून देईल त्यामुळे निवांत बसा की. परंतु तुम्हाला चांगलेच माहित आहे की , नक्की वस्तुस्थिती काय आहे .म्हणूनच तुम्हाला गावोगावी, गल्लीबोळात फिरून आम्हा पितापुत्रांचा नामोल्लेख करावा लागतो किंवा मग स्वतःच्या पूर्वजांची महती सांगावी लागत आहे .असेही शेवटी सत्यजीतसिंह पाटणकर यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आयोध्येला जातात आणि तुम्ही नाही याचा अर्थ काय ?
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम हे आयोध्येला जातात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला जावून त्यांना अभिवादन करतात, तर मग अशा वेळी आ. देसाई तुम्ही तालुक्यातच दिसता. त्यामुळे मग सेना तुम्हाला बोलावत नाही का, तुमच्या निष्ठेवर त्यांना शंका आहे ? असा प्रश्न निर्माण होतो आणि तो विचारला की तुम्हाला राग येतो यात आमचा दोष काय ? असेही सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले.
No comments:
Post a Comment