सिद्धनाथ रथोत्सवासाठी म्हसवडनगरी सज्ज - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, December 8, 2018

सिद्धनाथ रथोत्सवासाठी म्हसवडनगरी सज्ज


धनंजय पानसांडे/ सत्य सह्याद्री नेटवर्क
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ- जोगेश्वरीचा  रथोत्सव शनिवार दि 8 रोजी होत आहे. रथोत्सवासाठी आंध्र, कर्नाटकसह महाराष्ट्रातील लाखो भाविक म्हसवडमध्ये दाखल झाले आहेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून यात्रेसाठी येणार्‍या यात्रेकरूंना सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिका यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत  असल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली.
या यात्रेसाठी सुमारे 4 ते 5 लाख भाविक येत असतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने नियोजन व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम युद्धपातळीवर केले आहे.
रथमार्गावरील स्वच्छता, अडथळ्यांची विल्हेवाट, काटेरी झुडुपे काढणे, खड्डे बुजवणे, अडथळ्यांची विल्हेवाट, काटेरी झुडपे काढणे, खड्डे बुजवणे, रथमार्गावर कुठेही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
यात्रेकरूंना नळ कनेक्शन देण्याची व्यवस्था, नळाद्वारे पाणी पुरवठा, रथगृहाजवळ व आंबेडकरनगर पाणीपुरवठा टाकीजवळ स्टँड पोस्टद्वारे पाणीपुरवठा, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम खाते व खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा, यात्रा कालावधीत नागरिकांना व यात्रेकरूंना पुरेशा प्रमाणात शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याकामी  टीसीएल पावडर व तुरटी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
यात्रा कालावधीत अखंडपणे वीज पुरवठा होण्यासाठी वीज वितरण कंपनी, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, दहिवडी, म्हसवड येथे सूचना देण्यात आल्या आहेत. गरपरिषदेचे अग्निशमन व कर्मचारी वर्ग सज्ज ठेवण्यात आला आहे. यात्रेकरूंसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व पालिकेकडून औषधसाठा उपलब्ध औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेमधील हॉटेल, खानावळ, मिठाई अशा दुकानातील पदार्थांची तपासणी करण्याकामी अन्न व औषधी विभाग, सातारा यांच्याशी संपर्क  साधलेला आहे. यात्रेकरू भाविकांसाठी स्वतंत्र दवाखाने उभारण्यात येणार आहेत.
यात्रेसाठी म्हसवड शहरात येणार्या वाहनांची खासबाग मळा, दहिवड मळा, माळशिरस चौक, पोळ पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, भाटकी रोड, मार्केटयार्ड, पुळकोटी रस्ता, शिंगणापूर चौक या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. 
यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनगराध्यक्षा  स्नेहल सूर्यवंशी यांच्यासह सर्व नगरसेवक, सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन, तसेच सचिव ,आरोग्य विभागाकडील डॉ. लक्ष्मण कोडलकर, पोलीस स्टेशनकडून सपोनि मालोजीराव देशमुख, नगरपालिकेचे इंजिनिअर चैतन्य देशमाने,सर्व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
यात्राकालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी उपअधीक्षक अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त करण्यात आला असून यामध्ये एस आर पी चे 99 जवान असणारी एक तुकडी, स्वत:  वडनेरे, 3 ए पी आय, 7 पी एस आय व 140 पोलीस कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी सांगितले.
दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दर्शनबारीची  व्यवस्था करण्यात आली असल्याचे ट्रस्टचे चेअरमन बजरंग बबन गुरव  यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment