गटबाजीवर संजीवराजेंचा हुकुमी पर्याय, माढ्याचा तिढा: सर्वोत्तम पर्याय असल्याच्या फलटणवासियांच्या भावना - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, February 9, 2019

गटबाजीवर संजीवराजेंचा हुकुमी पर्याय, माढ्याचा तिढा: सर्वोत्तम पर्याय असल्याच्या फलटणवासियांच्या भावना



             सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


विक्रम चोरमले

/फलटण : माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथून अद्याप कुणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माण तालुक्यातील निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सर्वोत्तम पर्याय म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माढा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना सांगितल्याने माढ्यातील चुरस आणखीनच वाढली आहे.




येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढा मतदारसंघातील गटबाजी रोखण्याची असेल तर पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन पक्षातील गटबाजी रोखता येऊ शकते.आजअखेर पक्षाकडून दिल्या गेलेल्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडणारे सर्वत्र अंत्यत दांडगा जनसंपर्क असणारे, शांत, संयमी नेते म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांना माढा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी भावना माढा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार करत आहेत. सातारा जिल्हा परिषदेत मिळालेल्या अध्यक्ष पदाचे सोने करत उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीमंत संजीवराजें यांची शरद पवार यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये जवळीक पाहायला मिळाली. त्यामुळे माढ्याचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे श्रीमंत संजीवराजे यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.



माढा लोकसभा मतदार संघात सोलापूर जिह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला हे चार तालुके आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे दोन तालुके आहेत. यापूर्वी माढा या मतदारसंघातून स्वत: खा. शरद पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळीमध्ये मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण चालते यामध्ये प्रामुख्याने खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे व करमाळ्याच्या रश्मी बागल तसेच सांगोल्याचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपकआबा साळुंखे यांच्यातील वाद संपूर्ण मतदारसंघात प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते - पाटील गटाला उमेदवारी दिली गेली तर आमदार बबनराव शिंदे, जि,प अध्यक्ष संजयमामा शिंदे व रश्मी बागल तसेच सांगोल्याचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपकआबा साळुंखे निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करतील का हा मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे. 



विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली गेली तर त्यांच्याविरोधात भाजपाकडून संजयमामा शिंदे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील गटबाजी थोपवण्यासाठी पक्षासाठी एकनिष्ठ असणार्‍या राजेगटाच्या संजीवराजेंसारख्या उमेदवाराबाबत शरद पवार ऐनवेळी निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. संजीवराजे यांना उमेदवारी दिल्यास माढा मतदार संघातील गटबाजी मुळे होणारा बंड रोखण्यास मदत होऊ शकते. श्रीमंत संजीवराजे यांची उमेदवारी ही माढा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसची विजयाची परंपरा कायम राखू शकते.माढ्याचे असलेले सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात सुरु असलेल्या, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर, म्हसवडचे जयकुमार गोरे, शेखर गोरे हे एकत्रितपणे जमले होते. यावेळी जर-तरची गणिते मांडली गेली असल्याची चर्चा सुरू होती. 2014 ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून विजयसिंह मोहिते-पाटील जास्त मतदार संघात फिरकलेले नसल्याने मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. एकंदरीतच माढ्यातील जनता विजय मोहिते पाटील यांच्यावर मतदार नाराज असल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळाले आहे.



दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णयाकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. माढ्याची सीट निवडून येण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांच्याशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय  नसल्याचे बोलले जात आहे. माढा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते  संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी भावना व्यक्त करीत आहे.

No comments:

Post a Comment