सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
मुंबई: वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या तिनही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यांनी मुंबईंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले
स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे सुपुत्र अशोकराव भिलारे, जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसनराव शिंदे यांच्यासह महाबळेश्वरचे नगरसेवक सुनिल शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आखाडे, मेटगुताडचे माजी सरपंच नंदकुमार बावळेकर, रामचंद्र शिंदे, हेमंत शिंदे यांनी, पाचगणीतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलावर बागवान, नगरसेविका उज्वला महाडीक यांनी तर खंडाळा तालुक्यातील प्रदीप क्षिरसागर, अशोक धायगुडे, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके पाटील आणि केंजळ येथील जयप्रकाश जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उपरणे, दिशादर्शक दिवा व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ताकदीने आणि विश्वासाने काम केले आहे, ज्या धडाडीने निर्णय घेतले आहेत त्यामुळे तमाम जनतेत हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास निर्माण झाला आहे. ज्यांना ज्यांना जनतेची नाडी कळते ते सर्वजण त्यामुळेच भाजपात येत आहेत. त्याची प्रक्रिया वाई विधानसभा मतदारसंघातही पार पडली.
वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील अजूनही अनेकजण आपल्या संपर्कात असून त्यांचाही लवकरच प्रवेश होईल.
0 Comments