सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.......................................
सातारा ः सातारचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या भाजप प्रवेशाची नांदी दिसून येऊ लागली आहे. आमदारांपेक्षा समर्थकांनाच प्रवेशाची घाई झाल्याचे दिसून येत असून ‘सुरुचि’वरील बैठकीतून बाहेर पडणार्या आमदारांवर एका समर्थकाने चक्क भाजपची छत्री धरल्याने प्रवेशाचा बिगूल वाजल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घडाळ्यात बारा वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे
लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊ नये अशी मागणी सातारा जिल्ह्यातील काही आमदारांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून पवारसाहेबांनी उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देऊन अनेकांची नाराजी उडावून घेतली होती. त्याचे फलित म्हणूनच आता आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजप प्रवेश निश्चित केला आहे.
या प्रवेशपूर्वी आमदार भोसले यांनी अनेक मान्यवर समर्थकांशी संवाद साधला गेला होता. समर्थकांनी मुकसंमती दाखवली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्यापूर्वी भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय आमदार भोसले यांनी घेतला. त्यामुळे भाजप मधील सातारा-जावळीतील काही निष्ठावंत व संघर्षाची तयारी करणार्या नेत्यांचे काटे राष्ट्रवादीतून भाजप मध्ये येणार्या आ. भोसले यांना टोचू नये याची खुबीने भाजप नेत्यांना काळजी घ्यावी लागली होती. भाजप नेत्यांनी पक्ष प्रवेशाबाबत यापूर्वीच अनुकूलता दर्शवल्याने आता आमदार भोसले व त्यांचे शेकडो समर्थक भाजपवासी होण्यास उत्सुक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत त्यावेळी बोलताना, इतिहासात छत्रपती हे पेशव्याची नेमणूक करीत होते. आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात अशी मार्मिक टीका केली होती. सातार्यातील आमदार भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे हादरून गेल्याचे पाहण्यास मिळाले आहे.तंबू मध्ये उंट शिरला की, संपूर्ण तंबू उखाडून टाकतो की काय?अशी अवस्था सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाहण्यास मिळत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

0 Comments