Hot Posts

6/recent/ticker-posts

आकाडीला फोडणी ‘आमचं ठरलंय’ची, आमदार गोरेंना लागणार ठसका, सर्वपक्षीयांनी पुन्हा एकत्र वरपला रस्सा


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.............................................................
म्हसवड : आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात एकत्र झालेल्या खटाव-माणच्या विरोधकांनी दिवडच्या आकाडीला हजेरी लावत शिजलेल्या मटनाला ‘आमचं ठरलंय’ची फोडणी देत एकत्र रस्सा वरपला. विरोधकांंच्या या फोडणीचा ठसका तालुकाभर पसरला असून तो आमदार गोरेंनाही नक्कीच लागणार असून या आकाडीने माणच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे. 
 रिमझिम पावसाचा शिडकावा, अंगाला झोबणारा थंडगार वारा अन या वार्‍यांच्या लहरीत आमदार गोरे हटावची गरमागरम चर्चा रंगली. ‘आमच ठरलंय’च्या पहिल्या बैठकीला नसणारे व आमदार गोरेना विरोध करणारे  या तिसर्‍या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निमित्त होते दिवड येथे आण्णासाहेब काटकर यांनी आकाडी निमित्ताने ठेवलेल्या जेवणावळीची. तांबडा रस्सा, बाजरीची भाकरी जोडीला कांदा अशा बेताने बैठक उत्तरोउत्तर रंगत गेली.
या बैठकीला माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक व  शिवसेनेचे युवानेते रणजितसिंह देशमुख, तात्यापुत्र डॉ. संदीप पोळ, रासपाचे मामूशेठ वीरकर, बबनदादा वीरकर, डॉ महादेव कापसे, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. उज्वलकुमार काळे, माजी सभापती संदीप मांडवे, बंडा गोडसे, पृथ्वीराज गोडसे, जय राजेमाने, सभापती रमेश पाटोळे, आप्पासाहेब पुकळे, गोरख शिर्के, खंडेराव जगताप सुभाष नरळे, किशोर सोनवणे, अमोल काटकर,  दिलीप डोईफोडे, तानाजी कट्टे, बाबूराव काटकर, दादासाहेब शिंगाडे गोरख शिर्के, तानाजी मगर ,गणेश माने, रफिक मुलाणी,  बाबा माने यांच्यासह भाजपा, सेना, राष्ट्रवादी, आरपीआय, रासपा व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदारांविरोधा राबवणार ‘गाव चलो अभियान’
‘दहा वर्षे फसव्याच्या हाती सत्ता आली होती. त्याने माण खटावच्या स्वाभिमानी जनतेला दुसर्‍याच्या दावणीला बांधून दोन्ही तालुके विकासापासून कोसो दूर नेले.  त्याला माण-खटावमधून घालवण्यासाठीच आम्ही सर्व पक्षीय एकीची हाक दिली आहे. त्याला राष्ट्रवादी, भाजपा, सेना, रासपा, आरपीआय, काँग्रेस व काँग्रेसचे अदृष्य हात मदतीला धावून आलेत या सर्वांना बरोबर घेऊन विधानसभेत परिवर्तन घडवणार आहे. आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो हीच परिवर्तनची नांदी आहे. जनतेने मनात आमच्या बद्दल कोणतीही शंका वा कोण काय सांगतो याकडे लक्ष न देता तुमचं आमचं एकच आत्ता ध्येय आमचं ठरलंय. तालुक्यातुन गोरे हटावचा झालेला  निर्णय माण-खटावच्या गावागावात  लोकांच्यात जाऊन  निर्णय समजून सांगण्यासाठी नेते मंडळीनी आत्ता गाव चलो अभियान राबवण्याची संकल्पना प्रभाकर घार्गे  यावेळी बोलताना  स्पष्ट केली.
 घार्गे म्हणाले, येणार्‍या विधानसभेत आमच्यापैकी बरेचजण आपआपल्या पक्षातून इच्छूक असतील पण तालुक्ययातील हुकूमशाही प्रवृतीचा नायनाट करण्यासाठी आम्ही थांबण्याची भूमिका घेऊन एकच उमेदवार देणार वेळ पडल्यास अपक्ष लढवून हुकूमशाही नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.  त्यासाठी कोण कोठे गेला काय करतोय याकडे लक्ष न देता ‘आमचं ठरलंय’ मध्ये सहभागी होण्याचे आवहान घार्गे यांनी केले
अनिल देसाई म्हणाले, आमचं ठरलंयच्या माध्यमातून तालुक्यातील दृष्ट प्रवृती हद्दपार करण्यासाठी माझ्यासह अनेकांनी एक पाऊल मागे घेत सर्वाच्या सहमतीने एकच उमेदवार देवून विधानसभेला परिवर्तन करण्याचा विडा उचलला आहे. या बाबत कोणी ही शंका घेऊ नये. 
 प्रभाकर देशमुख म्हणाले. मागील दहा वर्षात दोनही तालुक्याचा ना पाणी प्रश्न सुटला ना उरमोडी, जिहेकटापूर, टेंभूचे पाणी आले, एमआयडीसी, अद्यावत हाँस्पीटल , शैक्षणीक सुविधा आमदारांना सोडवता आल्या नाहीत विकासा पासुन वंचित ठेवणार्‍याला आत्ता घालवण्याची वेळ आली आहे सर्वपक्षीयाच्या या परिवर्तनाच्या लढाईत मी सर्व सोबत आहे.

Post a Comment

0 Comments