सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.......................................
खेड : सदरबझार परिसरात मोठ्या प्रमाणावर जनावरांची हाडे रस्त्यावर पडलेली दिसून येत असून यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
सदरबझारमध्ये सुरू असलेला कत्तलखाना काही वर्षांपूर्वी नावालाच बंद झाला. मात्र, तेथे छुप्या पद्धतीने राजरोसपणे बेकायदेशीर जनावरांच्या अमानुष कत्तली सुरू आहेत. पाठीमागे पोलिसांनी गोवंशहत्या बंदी असणारी पाळीव जनावरे कत्तलीसाठी आणलेली ताब्यात घेऊन कारवाई देखील केली होती. जनावरांच्या कत्तली करून त्यांचे मांस मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवले जाते. सातार्यातील काही हॉटेलमध्ये याचा पुरवठा केला जातो आणि चोखंदळ ग्राहक देखील छुप्या पध्दतीने याचा आस्वाद घेण्यासाठी जात असतात. सदर बझारमधील कत्तलखाना हा ठराविक समाजासाठी उपजीविकेचे साधन आहे मात्र, जनावरांच्या केलेल्या कत्तलीचे अवशेष हे परिसरात राहणार्या नागरिकांच्या दारात, घरावर, रस्त्यावर आढळू लागली आहेत यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची आणि धार्मिक भावना दुखावण्याची दाट शक्यता असून याबाबत संबंधितांकडून काळजी घेतली जात नाही ही खेदाची बाब आहे.
सदरील बाब नागरिकांनी पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, याकडे जाणूनबुजून कानाडोळा केल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सदर बझारला नुकतेच आरोग्य सभापती लाभले आहे त्यामुळे नागरिकांच्या त्यांच्याकडून स्वच्छतेच्या बाबतीत माफक अपेक्षा आहेत. सातार्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून डेंगू, फ्लू, मलेरिया, कावीळ सारख्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, शासकीय आणि खासगी दवाखान्यात रुग्णांची सलाईनसाठी रांग लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. असे असताना जनावरांचे उघड्यावर पडलेले मांस खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा वावर सदर परिसरात जास्त वाढल्याने हाडे आणि मांस मिळवण्यासाठी जनावरांमध्ये आपापसात भांडणे आणि राडे होत आहेत यामध्ये जर कोणी नागरिक अडकला तर नागरिकांवर चालून जाण्यास आणि जीवघेणे हल्ले करण्यास ही भटकी कुत्री मागे पाहत नाहीत. पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर नागरिक कायदा हातात घेतील अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली

0 Comments