दुर्घटनेच्या भीतीने काळजात धस्स, शोधासाठी गावकर्यांची दमछाक
अजित निकम
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...............................................
आसू : येथील बंधार्यात एक दुचाकी पाण्यात आढळून आली. त्या गाडीस साडी लटकताना दिसल्याने एखादी मोठी दुर्घटना झाली असल्याच्या शक्यतेने ग्रामस्थांच्या काळजात धस्स झाले. दमछाक होईपर्यंत पाण्यात व किनार्यावर शोध घेतला असता कोणीही आढळून न आले नाही व आढळून आलेली गाडी चोरीला गेली होती. हे समजल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. तर दुसरीकडे या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
आसू-तावशी या दोन गावांना जोडणार्या मार्गावर बंधारा आहे. या बंधार्यात बुधवारी रात्री 9 च्या सुमारास काही ग्रामस्थांना बंधार्यामध्ये दुचाकी पडल्याचे दिसून आले. त्या गाडीला साडी अडकल्याचे दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस पाटील तसेच कोतवाल यांच्याशी संपर्क साधला आणि बरड पोलिस ठाण्यास कळविण्यात आले. पोलीस कर्मचारी येण्याची वाट पाहू लागले. पण, घटनास्थळी कोणीही दाखल झाले नाहीत. या घटनेची माहिती वार्यासारखी पसरल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पण सरकारी कर्मचारी कोणीही वेळेत दाखल झाले नाहीत. पोलिस न आल्याने ग्रामस्थांनी पोलीस पाटलाच्या मदतीने गावातील तरुणांना कोणाचा तरी जीव वाचेल या उद्देशाने पाण्यामध्ये उतरुन शोध घेण्यास सांगितले. पाण्यात उतरून एमएच 11 बीक्यू.5639 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही दुचाकी पाण्यातून बाहेर काढली. नंबरवरून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. तर दुसरीकडे कोण बुडाले आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्या लगत कोणीही सापडले नाही. काही ग्रामस्थांनी मोबाईल वरती गाडी नंबरचा शोध घेतला असता ती दुचाकी पांडुरंग नाझिरकर रा. गुणवरे यांची असल्याचे समजले व गुणवरे गावातील काही ग्रामस्थांना गाडीच्या मालकास संपर्क साधला असता ती गाडी चोरीला गेल्याचे समजले व त्यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल केल्याचे समजले. हा सर्व प्रकार सुमारे अडीच तास सुरू होता.
पोलिसांबाबत संताप
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता त्याठिकाणी या घटनेची नोंद नसल्याचे लक्षात आले. बरड पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. लवकर दाखल होऊ असे सांगून 2 तासांनी सर्व ग्रामस्थ घटनास्थळावरून गेल्या नंतर पोलिस कर्मचारी याठिकाणी आले व पहाणी करून गेले. अशा घटनांकडे पोलीस खात्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीच बरड पोलीस ठाण्याची हजेरी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments