मुलाखतींवर सावट आमदारांच्या ‘दांडी’चे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
................................................
सातारा : एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅड पॅच मधून जात असताना गुरुवारी सातार्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीवर सातारच्या आमदारांच्या ‘दांडी’चे सावट दिसून आले. त्यातच अजितदादांनी मी शिवेंद्रसिंह यांना फोन केला. परंतु, बोलणे झाले नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. तर दुसरीकडे भाजपने दीपक पवारांची महामंडळावर वर्णी लावल्याने शिवेंद्रसिंह यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे जिल्ह्यातील राजकारण रंगतदार होत चालले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी भवनात ठेवल्या होत्या. एकेकाळी पक्ष सत्तेत असताना पोवई नाक्यापासून जुन्या आरटीओ चौकापर्यंत गाड्या पार्किंगसाठी जागा नसायची. मात्र यंदाचे चित्र वेगळचे भासत होते. पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना सावध उत्तरे देत अजितदादांनी वेळ मारून नेली. त्यातच दादांची बॉडीलँग्वेज पाहून विधानसभेला बाशिंग बांधून बसलेले अनेकजण गळाटल्याचे दिसून आले.
175 जागा जिंकण्याचा दावा
जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न असून विधानसभा निवडणुकीत आघाडी 175 जागा जिंकणारच, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी पक्ष निरिक्षक सुरेश घुले उपस्थित होते. मुलाखती कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले वेगवेगळे लढलो त्यामुळे आमचा पराभव झाला. या निवडणुकीत मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत आघाडी करणार असून 175 जागा जिंकणारच. वंचित आघाडीशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. सातार्यात दक्षिण कराडमधून 2, फलटण व माण-खटावमधून प्रत्येकी 6 तर उर्वरित मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज आला आहे. या सर्वाच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. विद्यमान प्रतिनिधींना उमेदवारी द्यावी अशी मागणी बहुतांश कार्यकर्त्यांची असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान येत्या निवडणुकीत नव्या चेहर्यांना, तरुणांना संधी देण्याचा मनोदय शरद पवार यांनी याआधीच व्यक्त केला आहे. जागा वाटपाच्या बाबतीत एक पाऊल मागे किंवा पुढे घेण्याचा आघाडीचा प्रयत्न राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी घाबरणारा पक्ष नाही
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप सरकारकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. विरोधकांना उदध्वस्त केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीप यांच्या घरावर छापे पडणे हा त्याचाच एक भाग असू शकतो, असे अजित पवार यांनी सांगून सरकारविरोधात सडकून टीका केली. राज्यात दुष्काळाचं सावट आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. अद्याप धरणे भरली नाहीत. चारा छावण्यांची मागणी लोकांकडून होवू लागली आहे. दुबार पेरणी करावी लागणार असल्याने सरकारने शेतकर्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे पवार यांनी सांगितले.

0 Comments