संदीप कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................................
सातारा : आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांचा आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये यासाठी पक्षाचे नेते अजित पवारांपासून पक्षाचे सर्वेसवा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, जिल्ह्याचे नेते म्हणवणारे रामराजे व शिवेंद्रसिंह यांचे बंधू व राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे दुसरे हेवीवेट नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, या सार्या प्रकाराबाबत मौन बाळगल्याने मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्ते म्हणतील तसं’ असं म्हणत शिवेंद्रसिंह यांनी अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मीडियासमोर ते कितीही उदयनराजेंच्या बंधूप्रेमाचे दाखले देत असले तरी त्यांच्यामुळेच त्यांची राष्ट्रवादीत घुसमट झाली होती, हे लपून राहिलेले नाही. राज्यातील बदलते वातावरण पाहून त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते सांगत आहेत.
विशेष म्हणजे सातार्यात विधानसभा इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारल्यानंतर पक्षाचे नेते अजित पवारही हवालदिल झाले होते. परंतु, मी त्यांना फोन केला आहे. भलेही त्यांनी फोन घेतला नाही, पण ते पक्ष सोडणार नाहीत, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. नंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही शिवेंद्रसिंह मला भेटले असून ते पक्षाच्या चौकटीतच असल्याचे सांगितले. पण, इकडे घडले उलटेच.
सोमवारी नगरविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आटोपून शिवेंद्रसिंह यांनी मुंबई गाठली आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा बैठक घेत भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आणि आज मुंबईत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे.
रामराजे, उदयनराजे गप्प का?
विशेष म्हणजे शिवेंद्रसिंह यांच्या घुसमटीवर, पक्ष सोडण्यावर किंवा भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अवाक्षरही काढलेले नाही. कदाचित प्रवेश झाल्यावर ते अधिकृत बोलतील पण, ते दोघेही शिवेंद्रसिंह यांची मनधरणी करताना दिसले नाहीत. त्यामुळे या दोन्ही राजांच्या मौनाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
मताधिक्य कमी झाल्यापासून खासदार उदयनराजे हे स्वत:च्या विजयावर नाराज आहेत. इव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी रान उठवले होते. परंतु, पक्षातील कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. आता तोही मुद्दा संपला असून गेल्या महिनाभरापासून ते कासचे जलपूजन वगळता सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शिवाय शिवेंद्रसिंह यांनी लोकसभेला माझे काम केले आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात काम करणार नाही, असे वक्तव्यही खासदार उदयनराजेंनी केले होते. मात्र, आता शिवेंद्रसिंह यांनी पक्ष बदलल्यामुळे आता उदयनराजेंची नेमकी काय भूमिका असणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
दुसरीकडे माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाल्यापासून रामराजेंच्या वर्चस्वाला शह बसला आहे. ही पडझड रोखण्यासाठी बहूधा त्यांनी फलटणमध्येच डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे.
उदयनराजे-रामराजे यांचा वाद सर्वश्रूतच आहे. वास्तविक उदयनराजेंपेक्षा रामराजे आणि शिवेंद्रसिंह यांच्यात सख्य आहे. त्यामुळे रामराजे त्यांची मनधरणी करतील, असे वाटत होते. परंतु, तसे न घडल्याने यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मिसळीचा ठसका आता लागतोय
लोकसभा निवडणुकीवेळी शिवेंद्रसिंह आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एकत्र मिसळ डिप्लोमसी केली होती. तेव्हाही अनेकांना याचा ठसका लागला. मात्र, याचा खरा ठसका आता राष्ट्रवादीला लागला असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचा प्लॅन काय?
शिवेंद्रसिंह यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी खिळखिळी झाली असल्याने आता राष्ट्रवादीचा प्लॅन काय असणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे. बहूधा शशिकांत शिंदे यांना सातार्यात लक्ष घालावे लागणार अशी शक्यता असून त्यांची घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी शिंदेंना सातार्यात उतरवण्याची रिस्क न घेता नवा चेहरा देऊ शकेल, अशी चर्चा आहे.
दीपक पवारांना विचारले की नाही?
आम्हाला विचारल्याशिवाय भाजपमध्ये कुणाला घेणार नाहीत आणि मीच इथल्या आमदारकीचा दावेदार आहे, असे छातीठोकपणे दीपक पवारांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आता शिवेंद्रसिंह भाजपमध्ये जात आहेत. ‘आमदारांना घ्यावे का’ हे पवारांना वरिष्ठांनी विचारून घेतले की काय? याबाबात माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

0 Comments