संदीप कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
..........................................................
सातारा : आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला दणका बसला असून याची दखल घेत डॅमेज कंट्रोल साठी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार गुरुवारी सातार्यात येत आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस राष्ट्रवादीच्या रणनीतीचा ठरणार आहे.
पवार यांनी शिवेंद्रसिंह पक्षाच्या चौकटीत राहतील, असे सांगितल्याच्या दुसर्याच दिवशी आमदार भोसलेंनी पवारांना तोंडावर पाडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पवारांना डोक्याला हात लावण्याची पाळी आली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा हक्काचा जिल्हा असून अनेक ग्रामपंचायतींपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद, जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले असून शिवेंद्रसिंह भोसलेंच्या जाण्याने राष्ट्रवादी सातारी भाषेत ‘मुंडक्यावर’ आली आहे. त्यामुळे बहुतेक पवार आता सातार्यात तळ ठोकून राहतील, असा अंदाज आहे. गुरुवारचा दौरा याच रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने पहिला ठरू शकतो.
राष्ट्रवादीला मिळाला वेळ
आमदार शिवेंद्रसिंह यांनी विधानसभा निवडणुकीला दोन महिने अवकाश असताना भाजप प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असला तरी त्यातून सावरण्यासाठी वेळ मिळाला आहे. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीही सातार्यात फोडाफोडी करून शिवेंद्रसिंह यांना शह देण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. यासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे केव्हाच कामाला लागले आहेत. त्यांनी शहरातील अनेकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे.
शिवेंद्रसिंह यांचे बँक अध्यक्षपद जाणार?
शिवेंद्रसिंह भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे संचालक शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अध्यक्षपदावर अविश्वास ठराव आणू शकतात. मात्र, या अविश्वासात रामराजे आणि उदयनराजेेंची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.
मकरंद पाटील यांची
जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती
जिल्ह्यात पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंह भोसले यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादीने माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादीची सत्ता असलेली व देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली असून पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी सतर्क झाले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणून स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी जयवंत भोसले
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांना शिवेंद्रसिंह यांनी थांबवले असले तरी मानकुमरे यांनी राजीनामा दिल्यास शशिकांत शिंदे यांचे समर्थक व जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले यांची वर्णी लागण्याची शक्यता राष्ट्रवादीतून वर्तवली जात आहे.
शिवेंद्रसिंह यांच्या विरोधात दमयंतीराजे?
शिवेंद्रसिंह भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विधानसभेला कोणाला उतरवायचे असा प्रश्न राष्ट्रवादीपुढे आहे. त्यातच सोशल मीडियावर खासदार उदयनराजे समर्थकांकडून शिवेंद्रसिंह यांच्या विरोधात खासदार उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संदेश व्हायरल केले जात आहेत. परंतु, उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह यांच्या विरोधात काम करणार नाही, असे जाहीर सांगितले होते. त्यामुळे दमयंतीराजे यांची उमेदवारी पुढे येईल की नाही याबाबत साशंकता आहे. आता उदयनराजेंपुढे पक्षाचे काम करायचे की शिवेंद्रसिंह यांना मदत करायची असा यक्ष प्रश्न असून पवारांपुढेही मोठा पेच आहे. पण, पवार आता कोणता डाव टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. एकंदरीतच सातारचे राजकारण रंगतदार वळणावर पोहोचले असून सध्या भाजपने यात मोठी बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे ‘राष्ट्रीय’ म्हणवणारा काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे की नाही, अशी स्थिती जिल्ह्यात आहे.

0 Comments