योगेश गायकवाड
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: माण -खटाव तालुक्यातील गेल्या 40 वर्षाचा राजकीय इतिहास अनेकांना माहितच आहे. महाराष्ट्रातील इतर ठिकाणची परिस्थिती आणि विकासाचा आलेख पाहिला तर माण मतदारसंघ त्या तुलनेत काहीच नाही. एकीकडे कायमचा दुष्काळ आणि विकासाची बोंब असताना दुसरीकडे इथल्या नेत्यांचे पक्षप्रवेश जनतेसाठी की स्वत:साठी, असा प्रश्न इथल्या मतदारांना पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे इथली जनता विश्वासू आणि ठाम नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यामुळे माण तालुक्यातील नेत्यांनी पक्ष बदलले खरे त्यामुळे जनताही त्यांच्यासोबत पक्ष बदलणार की नेताच बदलणार याबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता आहे.
स्व. सदाशिवराव पोळ यांच्या काळापासून माण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने शरद पवार आणि घड्याळाला भरभरून साथ दिली. एक गावातील एक- दोन लोक संपूर्ण गावाचे मतदान ठरावयचे आणि संपूर्ण गाव त्यांच्या सांगण्यावरुन मतदान करायचे. अशा परिस्थितीत त्या ठराविक कुटुंबातील लोकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, बँक, शाळा आदी ठिकाणी नोकरी दिली जात होती.
त्यांच्या घराची प्रगती व्हायची. परंतु, संपूर्ण गाव पूर्णपणे अधोगतीकडे जायचा. यामुळे वर्षानुवर्षे विकासाचा आणि परिवर्तनाचा संबंध लांबपर्यंत पाहायला मिळत नव्हता. शिवाय तोंड वर करून बोलायची बिशादही नव्हती. शिक्षणाचाही अभाव होताच. परंतु, काळाबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून लोकांनी परिस्थितीवर मात केली. मुंबई, पुणे या ठिकाणी नोकर्या करुन, रंगकाम करुन कसेबसे पोटभरण्याचे काम केले. परंतु माण- खटाव तालुक्यातील परिस्थिती बदलली नाही. लोकांना इथे रोजगार मिळाला नाही का शेतीला पाणी मिळाले नाही. लोकांचे प्रश्न कायमच तसे राहून गेले आणि आजही ते तसेच आहेत.
दहा वर्षांपूर्वी लोकांनी बदल म्हणून नवीन रक्ताचे आणि तरुण तडफदार आमदार म्हणून जयकुमार गोरे यांना मोठ्या विश्वासाने आमदार केले. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू म्हणून मान मिळावला आणि माण- खटावला जनतेमध्ये एक आशेच किरण निर्माण झाला. या काळात आमदार जयकुमार गोरे यांच्या कडून गावोगावी पृथ्वी बंधारे आणि बैलगाडीही चालू न शकनारे रस्ते झाले. पण, एवढे जवळचे मुख्यमंत्री आसताना आमदारांना पाणी आणता आले नाही ही शोकांतिका आहे. त्यांनाही पाठिमागच्या सारखे दिवस वाढवायचे होते की काय ते लोकांना उमजले नाही. आपल्या या दहा वर्षांत पाणी देत आले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश केला.
त्यांच्या या निर्णयाने सर्वसामान्य विचारात पडले आहेत. आता गावागावात सुशिक्षित आणि तरुण लोकांना आमदारांच्या या निर्णयावर आजिबात विश्वास राहिला नाही. पाणी आणण्यासाठी दहा वर्षे लावली. पाठीमागे तीस-चाळीस वर्षे अशी गेली. दोन-तिन पिढ्या अशा गेल्या. आता किती दिवस अजून सर्व सामान्य जनता वाट पाहणार, अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे.
दुसरीकडे ‘आमचं ठरलंय’, मध्ये प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, रणजित देशमुख, आनिल देसाई यांच्या मधून एक उमेदवार देणार आणि त्यालाच लोकांनी निवडून द्यायचा हे कितपत पचनी पडणार हा एक प्रश्न आहे. सर्वजण वेगवेळ्या पक्षाचे नेतृत्व करणारे नेते प्रामाणिकपणे काम करणार का? आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात उमेदवार निवडून देण्यासाठी यांना पक्षाचा दबाव नाही का? असे एक ना हजार प्रश्न आहेत.
माणमध्ये स्वखर्चाने काम करनारे नेतृत्व शेखर गोरे आहेत. कामाचा माणुस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, त्यांच्याकडून रासप, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना असे पक्षांतर झाल्याने त्यांच्या नेतृत्वाबद्दलही लोक संभ्रमावस्थेत आहेत. सर्वच पक्षाकडून त्यांच्यावरती अन्याय झाल्याचे पाहायला मिळाले. मग माण-खटावच्या जनतेला ते कशाप्रकारे न्याय देणार हा सवाल आहे. त्यांना शिवसेना तिकीट देणार का, युती होणार का, ती टिकवली जाणार का जनतेच्या प्रश्नासाठी काय असे अनेक प्रश्न आहेत.
माण-खटाव तालुक्यातील जनता सर्व सामान्य जनता कायम जनतेच्या प्रश्नासाठी काम करणारा, ना कोणत्या पक्षाच लेबल लावता फक्त विकासकामासाठी झटणारा, मग तो इथला पाणीप्रश्न असो रोजगार वा उद्योगधंदे असो. आजवरच्या जखमेला तापुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी इलाजाच्या आणि शाश्वत विकासासासाठी काम करणार्या नेतृत्वाच्या शोधात आहे. यंदाच्या निवडणुकीत निवडून येणारा नेता माणच्या जनतेचा नवा कौल असणार आहे. त्यामुळे आता नेत्यांप्रमाणे जनता पक्ष बदलणार की नेताच बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

0 Comments