Hot Posts

6/recent/ticker-posts

माणमध्ये ‘ठरलंय’ म्हणताना ‘बिघडतंय’

 

‘आमचं ठरलंय’ मधून उमेदवारी न मिळाल्याने प्रभाकर देशमुखांचे कार्यकर्ते बंडाच्या पावित्र्यात

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर/म्हसवड :
‘आमचं ठरलंय’ मधून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी श्री देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. काहीही झाले तरी तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. तर सर्वांच्या मताचा सन्मान करुन योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही श्री देशमुख यांनी दिली.
‘आमचं ठरलंय’ मधून काल अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर झाली.आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमेदवारीवरून पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली.अनेकांनी  आता माघार नाही ‘प्रभाकर देशमुख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा व्हायरल केल्या .                    
या निर्णयाचे वेगवेगळे पडसाद माण-खटाव मध्ये उमटले. राष्ट्रवादी व विशेषतः प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमधून या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनीच समाज माध्यमांवर पोस्ट टाकून आज श्री देशमुख यांच्या निवासस्थानी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार माण विशेषतः खटावमधून मोठ्या संख्येने युवकांसहित जेष्ठांचे लोंढे देशमुख यांच्या निवासस्थानाकडे निघाले .
 आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी लोधवडे येथे जमण्यास सुरुवात केली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची  वर्दळ अनेकांचे लक्ष वेधून घेत होती .घोषणांनी परिसर दुमदुमला असताना कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर साधारण साडे अकरा वाजता बैठकीस सुरुवात झाली. अत्यंत पोटतिडकीने व संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत होते. जो निर्णय झाला तो आम्हाला मान्य नसून प्रभाकर देशमुख यांनीच उमेदवारी केली पाहिजे, आम्ही कोणाचेही काहीही ऐकणार नाही अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते.
 माजी सभापती संदीप मांडवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अनिल पवार, माणचे सभापती रमेश पाटोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मदने, राजूभाई मुलाणी, वडूजचे पृथ्वीराज गोडसे, सतीश मडके, किशोर सोनवणे, रमेश शिंदे, बाळासाहेब कदम, डॉ. संतोष देशमुख, धनाजी काळे, सुर्याजीराव जगदाळे, सुनील सूर्यवंशी, अभय जगताप,शहाजी बाबर, पै. विशाल जाधव राष्ट्रवादी युवकचे माण विधानसभा अध्यक्ष प्रशांत विरकर आदी मान्यवर व विविध स्थानिक स्वराज संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आभार मानून देशमुख यांनी सर्वांच्या विचाराने योग्य निर्णय घेवून सगळ्यांना सांगण्यात येईल असे जाहीर केले.
सन्मान राखून योग्य निर्णय
माण मतदारसंघातून वाईट प्रवृत्तींना हद्दपार करणं ही माझी प्राथमिकता आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखून योग्य निर्णय घेण्यात येईल.
- प्रभाकर देशमुख

हक्क सोडण्यास तयार
महाआघाडीत ही जागा स्वाभिमानी पक्षाला देण्याचे सुतोवाच जयंत पाटील यांनी केले आहे. पण मतदारसंघातील अपप्रवृत्ती घालविण्यासाठी लोकभावना ओळखून विजयी होणार्या उमेदवारासाठी स्वाभिमानी आपला हक्क सोडण्यास तयार आहे.
- अनिल पवार,
प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

आम्ही साहेबांच्या पाठिशी
खटावमधील संपुर्ण राष्ट्रवादी प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांनी माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी.
 - संदीप मांडवे, माजी सभापती, खटाव.

Post a Comment

0 Comments