सातारा: जिल्हा परिषदेच्या अनेक दालनात गुरुवारपासून अशी स्थिती आहे. शुक्रवारी 1 वाजता घेतलेले छायाचित्र.
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मानिनी नामक खरेदी-विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सावच्या नावाखाली जिल्हा परिषदेचे कर्मचारी गुरुवारपासून ‘जत्रे’त मश्गुल आहेत. यामुळे जनतेच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत.
गुरुवारपासून हा महोत्स सुरु असून मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी मोठा गाजावाजा करत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. मात्र, जत्रेच्या नावाखाली पन्नास टक्के झेडपी रिकामी आहे. अनेक कर्मचारी ‘उमेद’ नावाच्या संस्थेने दिलेले लाल टी शर्ट घालून जत्रेत हुंदडताना दिसत आहेत. वास्तविक या महोत्सवाचा ठेका एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे दिला असताना झेडपी कर्मचार्यांचे तिकडे काय काम? असा सवाल उपस्थित होत आहे. येथे येणार्या अनेकजणांनी त्यांचा ड्रेसकोड पाहून हे झेडपीचे कर्मचारी की डिलिव्हरी बॉय अशा शब्दांत खिल्ली उडवली.
झेडपीत विजेचा अपव्यय
इकडे जत्रा सुरु असली तरी जिल्हा परिषदेची कार्यालये वेळेनुसार सुरु आहेत. मात्र, कर्मचारी हजेरी लावून गुल झालेले असले तरी कार्यालयातील असंख्य ट्यूबलाईट, पंखे चालूच होते. त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. येेथे कामानिमित्त येणार्या नागरिक, महिलांची मोठी गैरसोय होत होती. रावसाहेब कुठे गेलेत, हे विचारायलाही तेथे कुणी नव्हते.
सीईओंचे लक्ष कुठे आहे
याप्रकरणी सीईओ संजय भागवत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते बैठका आणि जत्रेच्या नियोजनात व्यस्त होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. आधीच शासकीय कर्मचारी कामचुकारपणा करतात त्यातच ही असे इव्हेंट त्यांच्या पथ्यावरच आहेत, त्यामुळे अशा कामचुकारांवर सीईओ काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.
0 Comments