Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलिसांनी साधला नागरिकांशी ‘संवाद’, सहाय्यक निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांचा अनोखा उपक्रम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रहिमतपूर:
गेल्या महिनाभरापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये घरात राहून नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. दुसरीकडे सर्व पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तात मग्न आहे. अनेक ठिकाणी त्याची कडक अंमलबजावणीही सुरु आहे. त्यामुळे पोलीस म्हटलं की फक्त ते मारतात, किंवा कारवाई करतात, अशी पोलिसांची प्रतिमा निर्माण झाली असताना रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांशी अनोख्या पद्धतीने संवाद साधला. यामुळे रहिमतपूरकरांनी त्यांचे कौतुक तर केलेच. परंतु, पोलिसांविषयी आत्मीयता निर्माण झाल्याचे अनेक नागरिकांनी आवर्जुन सांगितले.
त्याचे झाले असे, सध्या सर्वत्र लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये कोरोना योद्धे असलेले पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल तर घरात राहणे गरजेचे आहेे. यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आपली सेवा बजावत आहेत. आज जवळपास चाळीस दिवस होत आले जनताही लॉकडाऊनमध्ये अडकली आहे. त्यामुळे रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी रविवारची सुटी साधून नागरिकांशी अनोखा संवाद साधला. काही नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये जाऊन पोलीस जीपवर असलेल्या साऊंड सिस्टिमद्वारे त्यांनी नागरिकांच्या धैर्याचे कौतुक केले. घराच्या गॅलरीतून, चौकटीतून योग्य अंतर राखून उभ्या असणार्‍या नागरिकांना बल्लाळ यांनी, संयम महत्त्वाचा असून छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्याच्या वेढ्यावेळी दाखवलेल्या संयमाचा दाखल देत नागरिकांनी घरात बसून साथ दिल्याबद्दल अभिनंदन केले. या संवादाबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत सोशल डिस्टन्सींग पाळत काही नागरिकांनीही याच साऊंड सिस्टिमवरून आपलेही मनोगत व्यक्त केले.

यावेळी रोकडेश्‍वर गल्लीत नागरिकांनी पोलिसांचे जोरदार अभिनंदनही केले. तसेच फुलांची रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. बल्लाळ यांच्या उपक्रमामुळे पोलिसांची प्रतिमा उजळण्यास देखील नक्कीच मदत झाली असून जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारीही बल्लाळ यांच्याप्रमाणेच आपले कर्तव्य निभावत आहेत त्या सर्वांना रहिमतपूरच्या नागरिकांनी मनोमन धन्यवाद दिले.

कोरोना युद्धात अग्रेसर राहू

 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मायक्रो प्लॅनिंगच्या सूचना केल्या आहेत. त्याही अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. इथून पुढेही नागरिकांना त्रास न होता कोरोनाला हरवण्याच्या युद्धात आम्ही अग्रेसर राहणार आहोत.
घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक
रहिमतपूर

Post a Comment

0 Comments