शिखर शिंगणापूर
थदाळे ता माण येथील कु. ऐश्वर्या माआप्पा शिंगाडे (वय-18) या अल्पवयीन मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी घडली.
थदाळे येथील माआप्पा बापू शिंगाडे यांची मुलगी ऐश्वर्या ही शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास काही लहान मुलींना बरोबर घेऊन पाणंद रोडच्या शेतात पोहण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीत पाठीला प्लास्टिकचे कॅन बांधून ऐश्वर्या पोहायला शिकण्यासाठी विहिरीत उतरली होती. यावेळी पाठीवरील प्लास्टिकचे कॅन अचानक सुटल्यामुळे ती पाण्यात बुडाली. यावेळी सोबत गेलेल्या अन्य लहान मुलींनी आरडाओरडा केला. जवळ असणाऱ्या शेतातील काही जणांनी ऐश्वर्याला पाण्यातून बाहेर काढून दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी ऐश्वर्या मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. ऐश्वर्या दहिवडी येथील महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकत होती. तिच्या मृत्यूमुळे थदाळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची खबर आप्पासो शिंगाडे यांनी शिंगणापूर पोलीस दुरक्षेत्रात दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. याबाबतचा अधिक तपास एम जे राऊत, डी के भिसे करीत आहेत

0 Comments