![]() |
| कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देताना रण मर्द मंडळाचे कार्यकर्ते, आजी व माजी सैनिक आणि ग्रामस्थ |
वेळे वार्ताहर
वाई तालुक्यातील पूर्व भागातील रणमर्द सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, कवठे व ग्रामस्थांच्या सहकार्याने कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे अनेक गरजू रुग्णांना आता याचा फायदा होणार आहे.
कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दवाखाने देखील आता कमी पडू लागले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांचे ऑक्सिजन विना हाल होवू नयेत म्हणून कवठे, तालुका वाई येथील रणमर्द सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामस्थांच्या सहभागातून पैसे गोळा केले आणि हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी मशीन खरेदी केली. कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर संख्या ही मुळातच कमी असलेने अनेक रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल होत आहेत. तसेच गरीब व आर्थिदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नाही, म्हणून त्यांच्या उपचारार्थ ही ऑक्सिजन मशीन उपयोगी पडेल. त्यामुळे गरीब रुग्णांना याचा आधार मिळेल, या सामाजिक भावनेतून ही मशीन खरेदी करण्यात आल्याचे मंडळाचे सदस्य व माजी सैनिक सचिन पोळ यांनी सांगितले. अजूनही मशीन संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
कोरोनाला थोपवण्यासाठी सर्व स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मात्र तरीही हा फैलाव वाढतच आहे. गंभीर रुग्णांना अत्यावश्यक असणारा ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावतात. तो तातडीने मिळावा यासाठी तरुण व होतकरू लोकांनी एकत्र येवुन सामाजिक सलोखा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. कवठेकर ग्रामस्थांची ही सुरुवात खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. ऑक्सिजन मशीन ची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचे मंडळातील कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. या मशीन मुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
ही मशीन मंडळातर्फे आरोग्य विभागाला उपलब्ध करून देताना आरोग्य विभागाचे डॉक्टर, कवठे गावाचे सरपंच श्रीकांत वीर, मंडळाचे अध्यक्ष मयूर डेरे तसेच अतुल डेरे, आजी सैनिक विश्वास पोळ व प्रमोद डेरे,माजी सैनिक सचिन पोळ , निकेश डेरे, चंद्रशेखर डेरे, संकेत हावरे,राकेश डेरे, किरण घाडगे, प्रवीण धेडे, रितेश डेरे, सुरेंद्र पोळ ,विक्रम डेरे, शिवाजी पोळ, संदीप पोळ, आनंदराव डेरे आदी उपस्थित होते.

0 Comments