Ticker

6/recent/ticker-posts

वेळे गावालाही हवी टोलमाफी : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

वेळे/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वानुसार पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी टोल नाके उभारले आहेत. परंतु याच टोलनाक्यावर स्थानिकांची दररोज बाचाबाची होताना दिसते. यामध्ये सातारा जिल्यातील आनेवाडी टोलनाका तर बराच प्रसिद्ध आहे. या टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत मिळावी म्हणून बऱ्याच वेळा आवाज उठविण्यात आला होता. आत्ता कुठे येथे स्थानिकांना सवलत मिळत आहे.

या टोलनाक्यावर टोलनाक्यापासून वीस किलोमीटर अंतरात येणाऱ्या गावांना सवलत मिळणार आहे. यात सातारा तालुका, जावळी तालुका, कोरेगाव या तालुक्यातील काही गावांना तर वाई तालुक्यातील भुईंज, पाचवड, उडतारे, विरमाडे, जांब, किकली, बोपेगाव, पसरणी, वाई, सुरुर, कवठे आदी गावांचा समावेश आहे. मात्र महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी सर्वात जास्त भूसंपादन करण्यात आलेल्या आणि सर्वात जास्त योगदान दिलेल्या वाई तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेळे गावाला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून येथील स्थानिक टोलनाक्यावर सवलत मिळण्यासाठी झटत होते. त्यांना महामार्ग प्राधिकरणाने ठेंगाच दाखवला. त्यामुळे येथील नागरिकांचा प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

वेळे गावाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला कधीही अडवले नाही. त्यामुळेच येथील शेतकऱ्याच्या सर्वात जास्त जमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच आत्ता नवीन खंबाटकी बोगद्यासाठी देखील येथील स्थानिक शेतकऱ्याच्या सर्वात जास्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळे गावचे योगदान हे वाखाणण्याजोगे आहे. असे असतानादेखील वेळे गावावर महामार्ग प्राधिकरण अन्याय करीत आहे.

येथील नागरिकांना दररोज नोकरीनिमित्त, शाळेनिमित्त, कार्यालयीन कामकाजासाठी, दवाखान्यात वगैरे बाबींसाठी सातारा येथे जावे लागते. दररोज ये जा करणाऱ्यांची संख्यादेखील भरपूर आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आनेवाडी टोलनाक्यावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या टोलनाक्यावर सवलत मिळाली तर येथील स्थनिकांची चांगली सोय होईल. परंतु यासाठी येथील स्थानिकांना झगडावे लागत आहे, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. 

वेळे गावच्या योगदानाचा विचार करून येथील नागरिकांना देखील टोलमाफी मिळावी, नव्हे ती मिळालीच पाहिजे. वेळे गावाला डावलून चालणार नाही. तेही या टोलमाफी साठी आग्रही आहेत. महामार्गापासून दूर अंतरावरील गावांना जर टोल सवलत मिळत असेल तर महामार्गावरील वेळे गावाला देखील ही सवलत मिळाली पाहिजे. वेळे ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत वेळे गावाला टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत येथील बोगद्याचे काम बंद पाडणार असल्याचे संकेतच जणू मिळत आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने वेळीच सावध होवून इतर गावांसमवेत वेळे गावालाही न्याय द्यावा अन्यथा येथील स्थानिकांच्या आक्रोषाला सामोरे जावे.

मग आम्हाला लाभ का नाही
वेळे गावावर महामार्ग प्राधिकरण अन्याय करीत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे. वेळे गावचे योगदान हे इतर गावांच्या तुलनेने जास्तच आहे. सवलत दिलेली काही गावे ही वेळे ते आनेवाडी टोलनाका या अंतरापेक्षाही जास्त अंतरावर आहेत. तरीही त्यांना या सवलतीचा फायदा मिळतोय, मग वेळे गावाला याचा लाभ का मिळू शकत नाही? असा सवाल स्थानिक विचारात आहेत.

Post a Comment

1 Comments