वेळे
वेळे ता. वाई येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातील सहापदरीकरण रस्त्याचे काम सुरु असून हे काम वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले यांनी गायत्री प्रोजेक्ट या कंपनीने तब्बल 109691 ब्रासची काढलेल्या गौण खनिजाची राँयल्टी न भरल्याने वरील अधिका-यांनी संयुक्तिक छापा टाकून कामाची पहाणी करून शासनाची कंपनीने आजपर्यंत केलेल्या फसवणुकीमुळे तात्काळ काम बंद करण्याचे आदेश देऊन कंपनीची गौण खनिज व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी १० ते १५ वहाने वरील अधिका-यांनी सील केली आहेत. वाई तालुक्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात छापा कोणत्याही अधिका-यांनी टाकला नव्हता. त्यामुळे वाई तालुक्यातील खाण मालक व चालकांच्यात खळबळ उडाली आहे. यामुळे प्रांत आणि तहसीलदार यांच्या या धाडसी कामगिरीचे वाई तालुक्यातून कौतुक होत आहे.
वाई तालुक्यातील वेळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असणा-या खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातील सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला दिले आहे. त्यांनी हे काम करीत असताना त्यातून माहे सप्टेंबर २०२० पर्यंत निघालेले गौण खनिज 115691 ब्रास इतके असून ते शासनाची कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केलेले आहे व त्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. असे असताना त्यांनी फक्त 6000 ब्रासचे चलन भरले आहे. बाकीची 109691 ब्रासची रक्कम आज अखेर भरलेली नसल्याने सातारा जिल्हाधिकारी यांनी दिनांक ५ -११-२०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याआधी २६/१०/२०२० रोजी वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनीही नोटीस बजावली होती.तरीदेखील वरील जबाबदार अधिका-यांच्या नोटीसा धडकूनदेखील गायत्री प्रोजेक्टस या कंपनीने बेकायदेशीररित्या गौणखनिज उत्खनन सुरूच ठेवले होते व त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याने याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले – राजापूरकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजणेच्या दरम्यान वेळे ता. वाई येथे सुरु असलेल्या नवीन बोगद्याच्या कामावर अखेर छापा टाकला. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी अनधिकृतपणे रीतसर परवानगी न घेताच या कंपनीने बेकायदेशीररित्या हे उत्खनन सुरूच ठेवले होते. आजपर्यंत या कंपनीने 115691 ब्रास इतके उत्खनन केल्याचे टाकलेल्या छाप्यामध्ये निदर्शनास आले. शासनाची फसवणूक करून विनापरवाना केलेल्या या उत्खननाची राँयल्टीच्या रकमेचा भरणा शासनाच्या तिजोरीत करीत नाहीत तोपर्यंत येथील काम तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश देवून गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी सदर वाहने समक्ष सील करून गायत्री प्रोजेक्टच्या वेळे येथील कार्यालयाजवळ लावण्यात आलेली आहेत. याची वसुलीची एकूण रक्कम 199966000 (एकोणीस कोटी नव्याण्णव लाख सहासष्ठ हजार ) एवढी रक्कम आज रोजी दिलेल्या लेखी नोटीसापासून ७ दिवसाच्या आत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत हि रक्कम न भरल्यास गायत्री प्रोजेक्ट या कंपनीवर कायदेशिर कारवाईचा नियमानुसार बडगा उगारण्यात येणार आहे असा लेखी पत्राद्वारे वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले – राजापूरकर, वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिले आहे. यावेळी सुरूरचे मंडलाधिकारी एस.एस. जाधव, गावकामगार तलाठी एस.एम.राठोड हे यावेळी उपस्थित होते.
सोबत :- सील केलेली वहाने व कारवाईस्थळाची प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी पाहणी करताना व सोबत गायत्री प्रोजेक्ट्सचे अधिकारी .
0 Comments