Hot Posts

6/recent/ticker-posts

वेळे गावालगत आढळला बेवारस मृतदेह

वेळे वार्ताहर दिनांक 23
वेळे, तालुका वाई येथे गावानजीक असलेल्या महामार्गाच्या कडेला असलेल्या पडीक शेतात अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळला. हा मृतदेह संपूर्ण सडला असून चेहरा विद्रूप झाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महामार्गाची सफाई करणारे कामगार दुपारच्या वेळी त्या ठिकाणी सफाई करत होते. त्यांना तेथे उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता त्यांना रस्त्यकडेच्या एका पडीक शेतात चाहुर नावाच्या शिवारात अंदाजे 20 फूट खोलीवर एक मृतदेह आढळला. त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली. भुईंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक त्यांच्या सहकाऱ्यांना घेवून तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता त्या मृत व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे सडला असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या अंगात काळ्या रंगाची पँट व निळसर हिरव्या रंगाचा शर्ट होता. त्याची कपडेही फाटली होती. तसेच अंगावर रक्ताचे डाग देखील होते. यावरून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हा मृतदेह नेमक्या कोणत्या व्यक्तीचा आहे याचा खुलासा करणे हे पोलिसांना आव्हानच आहे. मृतदेह पूर्णपणे सडला असून पोलिसांनी याचा रीतसर पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments