Ticker

6/recent/ticker-posts

सर्व शासकीय अधिकार्‍यांनी हातात हात घालून कोरोनाचा मुकाबला करावा ः आ. मकरंद पाटील

सगळया मुख्याधिकार्‍यांनी शहरे टाईट करावीत त्याचा परिणाम नक्कीच चांगला होईल 
वेळे वार्ताहर दिनांक ३०
 मागील वर्षीच्या सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दरम्यान कोरोना रोगाने मतदार संघात थैमान घातल्याने रुग्णसंख्या झपाटयाने वाढत होती. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी माझ्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस खाते, आरोग्य विभाग या सर्वांनी एकत्रित येवून हातात हात घालून काम केल्याने त्यावेळचे कोरोनाचे थैमान रोखण्यात सर्वांना यश आले. त्यानंतर कोरोना संपला असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे राजकिय, सामाजिक शैक्षणिक, मंदिरे, लग्न संमारंभ सुरु झाले. तोंडाला मास्क न लावता अंतर न ठेवता सर्व कार्यक्रम करण्यात येवू लागले. त्याचा दुश्परिणाम म्हणून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मतदारसंघातील गावांमध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. याला थोपविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सर्व शासकीय अधिकार्‍यांनी एकत्रीत येवून आवश्यक तेथे कारवाई करून कोरोना थोपविण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे, असे आवाहन वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरचे आमदार मकरंद पाटील यांनी वाई नगरपालिकेच्या सभागृहात कोरोना आढावा बैठकीच्या दरम्यान प्रशासनाला केले आहे.
आ. पाटील पुढे म्हणाले, सध्या लोणंद, शिरवळ, खंडाळा, वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर या ठिकाणी व परिसरातील गावांमध्ये मोठया प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत आहे. या रुग्ण संख्येला थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने गावोगावी टेस्टींगची संख्या वाढविणे गरजेचे असून रुग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर होम आयसोलेशन करतो व त्याच्या कुटुंबियांचीच कोरोना टेस्ट करून ते पॉझीटीव्ह आहेत का हे पाहून निवांतपणे राहतो. परंतू बरेचवेळा त्या ठिकाणचा पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर कोणा कोणाच्या संपर्कात आला ही साखळी शोधण्याचे टाळत आहे. याचा दुश्परिणाम असा होतो की त्याच्या मनगटावर शिक्का नसल्याने तो शहरात व ग्रामीण भागात उजळ माथ्याने फिरत असल्याने तो कोरोना वाढीस मदत करतो. यामुळे त्याच्या घरापुरते कंटेटमेंट झोन न करता प्रशासनाने खबरदारी घेवून संपर्कांतील लोकांच्या तपासणीला गती देण्याचे गरजेचे आहे.
शिरवळ, लोणंद व खंडाळा येथील एमआयडीसीमधील अनेक बाहेरील लोक कामा निमित्त येजा करीत असतात. त्यांच्यावर कुठलीही बंधने नाहीत किंवा तो खरेच कामासाठी येतो का याचा पुरावा त्यांच्या जवळ नसल्याने तेथील तहसिलदार व पोलीस प्रशासनाने त्यांच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी कंपनीच्या मालकांना त्यांच्याकडील कामगारांना ओळखपत्र देवून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच शक्यतो कामगार स्वतःच्या बसने ने आण करावेत. दिवसेंदिवस परिसरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कंटेटमेंट झोनचे आदेश वाईच्या प्रांताधिकारी कुठल्याही क्षणी देवू शकतात. याचे भान सर्वच शासकीय यंत्रणेने करणे गरजेचे आहे. खंडाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे स्वतः जातीने लक्ष देत नसल्याने व कामात हलगर्जीपणा करीत असल्याने त्यांनी नाराची व्यक्त केली. 
पूर्वी कोरोनाची लस येईल व या रोगाला त्यामुळे आळा बसेल असा गैरसमज होता. आज लस आल्यानंतरही कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण झपाटयाने वाढत आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर येथील मुख्याधिकारी व प्रशासनाने यांनी एकत्रित येवून तोंडाला मास्क न लावणार्‍यांवर तसेच समांतर अंतर न ठेवणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कडक कारवाई करणे गरजेची बाब बनली आहे. याकडे तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये तपासणी करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. हे करीत असताना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नक्की वाढेल परंतू ती वाढलेली चालेल. त्याचा काही दिवस त्रास होईल परंतू अटकाव करण्यात यश येईल. पेशंटची संख्या खाली येईल. 
वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, खंडाळा येथील मुख्याधिकार्‍यांनी भरणारे आठवडे बाजार व विविध प्रकारचे विक्रेते हे रस्त्यावर गर्दी करून रस्त्यावर बसतात यांच्यावर कोणाचेही लक्ष नसल्याने प्रत्येक शहरात तोबा गर्दी दिसत आहे. पोलीसांनी कितीही दंडात्मक कारवाई केली तरी नागरिकांना फरक पडत नाही. यासाठी कडक पावले उचलली तरच शहरात व गावात कोरोना रोगाने घातलेले थैमान रोखण्यात नक्की यश येईल. मागील वर्षीच्या पध्दतीने व हिरीरीने सर्व शासकीय यंत्रणा एकत्रीत येवून कोरोनाशी लढा देण्याची गरज आहे. अशा पध्दतीने कडक निर्बंध घालून त्याचे काय परिणाम होतायेत हे नक्की सर्वांनी पाहूया. राज्य सरकार ज्या भागात कोरोनाची वाढती संख्या पाहून लॉकडाऊन करण्याच्या स्थितीत असल्याने त्याचा फटका व्यापार्‍यांसह सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यात सर्वांचाच आर्थिक तोटा होणार आहे. पूर्वीचा कटू निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडू नका. त्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने सॅनिटाझरचा वापर करून समांतर अंतर ठेवत मास्क वापरून शासनाला सहकार्य केल्यास नक्कीच लॉकडाऊन टाळता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्राताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले, तहसिलदार रणजीत भोसले, मुख्याधिकारी विद्या पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, भुईंज सपोनी आशिष कांबळे, तसेच तीन्ही तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

सोबत फोटो :
आढावा बैठकीदरम्यान उपस्थित आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजपुरकर चौगुले, तहसिलदार रणजित भोसले

Post a Comment

0 Comments