– पाणी पुरवठा सभापतींसह नगराध्यक्षांचा मॅरेथॉन दौरा
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
सातारा : सातारा शहराच्या हद्दीत नव्याने आलेल्या शाहुपुरी क्षेत्रासाठी एक खुषखबर आहे. या भागासाठी प्रस्तावित असणाऱ्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे काम मे अखेर पूर्ण होत असून 1 जुलै पासून ही योजना कार्यान्वित होत असल्याची खात्रीशीर माहिती पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी दिली.
सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची बैठक पालिकेत पार पडल्यानंतर नगराध्यक्ष माधवी कदम पाणी, पुरवठा सभापती सीता राम हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, समाजकल्याण सभापती संगीता आवळे, नगरसेविका आशा पंडित, माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंता सतीश अग्रवाल, माजी शिक्षण सभापती राम हादगे, किशोर पंडित, नगराध्यक्ष स्वीय्य सहाय्यक अतुल दिसले, पाणी पुरवठा विभागाचे संदीप सावंत, बावने, नंदू कांबळे इ च्या उपस्थितीत कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा दौरा झाला. या दौऱ्याच्या पाहणीत कण्हेर पाणी योजनेतील शाहूपुरी येथील आठ लाख लीटर पाण्याची टाकी, पेढयाचा भैरोबा येथील जलशुद्धीकरण केंद्र, तसेच कण्हेर योजनेच्या उपसा पंपगृहाची पाहणी झाली. दरम्यान नगरपालिकेच्या शाहूपुरी येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी प्रस्तावित क्षेत्रात नागरिकांना येणाऱ्या पाण्याच्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या.
जलशुध्दीकरण केंद्रातील सेट लिंक टँक, फिल्टर बेड, स्टोअरिंग टँक, तसेच इतर पंपगृहातील सुविधांची पाहणी नगराध्यक्ष माधवी कदम व पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी केली.
काय आहे कण्हेर योजना?
२०१५ मध्ये प्रस्तावित झालेल्या कण्हेर योजनेचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होणार असून कृष्णा उद्भवातील 4500 नळ कनेक्शन कण्हेर योजनेकडे हस्तांतरित होणार आहे याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सतीश अग्रवाल यांनी दिली. मूळची 31 कोटी 31 लाख योजनेची सुधारित किंमत 42.98 कोटी रुपये असून कण्हेर धरण ते शाहुपुरी या दरम्यान साडेदहा किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली आहे. पंपगृहात दीडशे एच.पी. चे तीन पंप व एक पंप स्टँन्ड बाय ठेवण्यात येणार आहे. येथील विद्युतीकरणाच्या व्यवस्था व इतर किरकोळ तांत्रिक बाबींसह ही योजना 31 मे अखेर पूर्ण करण्यात येत आहे. एक महिना ट्रायलचा वगळता १ जुलै पासून शाहुपुरीकरांच्या घरात कण्हेर योजनेचे पाणी प्रत्यक्षात पोहचणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. नगराध्यक्ष माधवी कदम व पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी या तांत्रिक बाबीची माहिती घेतली.
योजनेची वैशिष्टय
१. सायफन पध्दतीने कण्हेर योजनेचे पाणी येणार
२. वीज खर्चात २५ % बचत
३. शाहुपुरीकरांना चोवीस तास मुबलक पाणी
४. दररोजचा ३ एमएलडी (दलघमी ) पाण्याचा उपसा
५. कृष्णा पाणी योजनेवरील भार कमी होणार
उदयनराजे यांच्या शब्दाची प्रचिती
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कण्हेर योजना प्रस्तावित करण्याचे सर्वप्रथम सूतोवाच केले होते. त्यानंतर उदयनराजे यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कण्हेर योजनेचा निधी मिळविला. 2018 च्या सुधारीत तांत्रिक मान्यतेनंतर तत्कालीन शाहूपुरी ग्रामपंचायतीने जलवाहिन्यांची कामे पूर्ण करून घेतली. शाहुपुरी क्षेत्रातील 4500 कनेक्शन नवीन कण्हेर योजनेवर हस्तांतरित होत आहे. उदयनराजे यांच्या दूरगामी धोरणामुळे कण्हेर योजना पूर्णत्वास जात असून या कामाचा सातारा विकास आघाडीला मोठा राजकीय लाभ होण्याची चिन्हे आहेत.

0 Comments