Ticker

6/recent/ticker-posts

प्रशांत जाधव शिवसेनेच्या वाटेवर मायणी गटात देणार टक्‍कर; सेनेला मिळणार आक्रमक चेहरा


 

प्रतिनिधी

खटाव तालुक्यात गेली अनेक वर्ष पत्रकारिता व समाज कार्याच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असलेले व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत बहुजनांचा चेहरा म्हणून मायणी जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार युवा नेते प्रशांत जाधव शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. नुकतीच त्यांनी शिवसेनेचे उपनेते व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते असलेले प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
प्रशांत जाधव गेली अनेक वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आहेत. बहुजनांचा चेहरा म्हणून गेली अनेक वर्षे ते कार्यरत असून मायणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात लढवून सर्वसामान्यांसाठी सत्तेची कवाडे उघडी करण्याचा मानस त्यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केला होता. गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे कट्टर समर्थक म्हणून काम करत असलेले प्रशांत जाधव यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी पासून गुदगे यांच्यापासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी थेट गुदगे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत मायणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर त्यांचा खटाव तालुक्यात वाढलेला वावर पाहता व दरम्यानच्या काळात माजी पंचायत समिती संदीप मांडवे यांच्यावर दाखल झालेल्या एका गुन्ह्यात व बैलगाडी मालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांनी घेतलेली भूमिका पाहता त्यांची राजकीय वाटचाल नक्की झाली होती. त्यानंतर त्यांनी नुकतीच शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत. जाधव यांनी शिवबंधन हाती बांधल्यास त्यांच्यासोबत असलेल्या प्रचंड मोठा युवा वर्ग हा शिवसेनेची खटाव तालुक्यातील जमेची बाजू  ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments