| सातारा: शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर आरोपीला घेऊन जाताना पोलीस. |
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क/ सातारा
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी आरोपीस पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवून 3 वर्ष सक्त मजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. दंडापैकी 2 हजार रूपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वसंत उत्तम वायदंडे (वय 45, रा. साई मंदिराजवळ, गोडोली, सातारा मूळ गाव हेळगाव, ता. कराड) असे शिक्षा झालेल्या इसमाचे नाव आहे.
दि. 26 मे 2018 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास यातील पीडित अल्पवयीन मुलगी (वय 13) ही आपल्या गोडोली (सातारा) येथील घरात एकटीच असताना शेजारी राहणारा तिच्या ओळखीचा वसंत उत्तम वायदंडे हा तिच्या घरात गेला. अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून त्याने तिच्याशी गोड बोलून तिला आपल्याजवळ ओढले. स्वत:चे व तिचे कपडे काढून आपण मज्जा करु असे म्हणून तिचे अंगाशी झोंबाझाबी करुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.
त्यामुळे अल्पवयीन मुलगी घरातून पळून ओरडत बाहेर आली. त्यानंतर आरोपी वायदंडे हा घरातून पळून गेला. झालेला प्रकार पीडित मुलीने आपली आई घरी आल्यानंतर सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकूण सहा साक्षीदार तपासले
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांनी करुन आरोपी वसंत उत्तम वायदंडे यास अटक करुन त्याच्याविरोधात गुन्ह्यात भक्कम पुरावा गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सातारा जिल्हा न्यायालयातील विशेष सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली.
या खटल्यात पीडित व फिर्यादी यांच्यासह एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात झालेल्या साक्षीवरुन व सरकार पक्षाने दाखल केलेल्या पुराव्यावरुन व युक्तीवादावरून सत्र न्यायालयाने यातील आरोपीस आज पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवून 3 वर्ष सक्त मजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. दंडापैकी 2 हजार रूपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्पेै सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एन. डी. मुके यांनी काम पाहिले. त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश पवार, सहाय्यक फौजदार उर्मिला घार्गे, शमशुद्दिन शेख, अजित फरांदे, वैभव पवार, क्रांती निकम, पद्मिनी जायकर तसेच अमित भरते, राजेंद्र कुंभार, रेहाना शेख, गजानन फरांदे यांनी मदत केली आहे.
0 Comments