Ticker

6/recent/ticker-posts

गायत्रीदेवींची खटावात भिरकिट, जिल्हा बँकेचा आखाडा रंगात

  जिल्हा बँकेच्या अनुषंगाने मायणी अर्बन बँकेत चर्चा करताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे,संदीप मांडवे आदी मान्यवर.(फोटो- दत्ता कोळी)

मायणीत गुदगे-मोरेंसमवेत बैठक

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी :
सध्या  सातारा जिल्हा बँकेच्या  माध्यमातून  राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांनी आपल्रा गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु, लग्न कोणाचे लागणार हे येणारा काळच ठरवेल. याच अनुषंगाने खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या  नेत्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यानी बुधवारी मायणीमध्ये नंदकुमार मोरे व सुरेंद्र गुदगे यांची मायणी  अर्बन बँकेत भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या  या भेटीची चर्चा सर्वत्र झाली. या  भेटीदरम्यान माजी सभापती संदीप मांडवे व इतर प्रमुख कार्यकर्ते  उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार खटावच्या  दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी जिल्हा बँकेचा निर्णय  हा सर्वस्वी जिल्ह्यातील नेतेच घेतील, असा निर्णय दिल्यामुळे  अनेक इच्छुकांची गोची झाली. जिल्हा बँकेच्या  अनुषंगाने अनेकांनी मुंबईच्या  वाऱ्या केल्या.  प्रामुख्याने सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे हे नवीन चेहरे होते.  त्यांनी अजित पवारांकडे तशी फिल्डींग लावली होती. परंतु, पवारांनी तो चेंडू रामराजेंच्या कोर्टात टाकल्यामुळे काही जण नाराज झाले. नवीन चेहऱ्याना संधी द्या, असे सुचोवाच अजित पवारांनी केले होते. त्यातून  निमसोडच्या  नंदकुमार मोरे यांचे नाव औंधमध्ये फायनल झाले.
नंदू मोरेंच्या बरोबरीने सुरेंद्र गुदगे यांनीही चांगलाच जोर लावला होता. परंतु,त्यांची ताकत कमी पडली. खरं तर गुदगे हे  धडाडीचे नेते आहेत. त्यांनी मायणी  जिल्हा परिषद मतदारसंघाबरोबरच खटाव तालुक्यात  विकासकांमाचा सपाटा लावला आहे. पार्टीसाठीही धडपडून काम करताना दिसतात. परंतु, मोक्याच्या  ठिकाणी पार्टी त्यांना नेहमी डावलते, हे अनेक वेळा दिसूनही आले आहे. तरीही ते नाराज न होता आज अखेर पार्टीचे काम इमाने इतबारे करीत असतात.
दरम्यान, ते चेअरमन असलेली मायणी अर्बन बँक अतिशय  चांगली चालवली असून त्यांना  बँकेचा दांडगा अनुभव आहे. याच धर्तीवर जिल्हा बँकेला त्यांच्या नावाचा विचार होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु, राष्ट्रवादीतून सद्यस्थितीला नंदू दादांचे नाव पुढे आले आहे. नंदकुमार मोरे हेही राष्ट्रवादीचे सक्रिय नेते आहेत. त्यांनी निमसोड गटात आपला चांगला जम ठेवला आहे. याच  अनुषंगाने पुढील रणनीती ठरविण्यासाठी गायत्रीदेवी  बुधवारी मायणीत आल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मात्र या बैठकीत त्यांनी मोरे आणि गुदगे याना कोणता कानमंत्र दिला हे समजू शकले नाही.

प्रभाकर घार्गे यांची भूमिका गुलदस्त्यात 

जरी पक्षाने नंदकुमार मोरे यांचे नाव पुढे आणले असले तरी सोसायटी मतदार मध्ये प्रभाकर घार्गे यांचेच प्राबल्य असल्याचे सर्वश्रुत आहे. घार्गे साहेबांनी आपली भूमिका अजून गुलदस्तात ठेवली आहे. त्याच प्रमाणे हरणाई सूत गिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे ही जिल्हा बँकेत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. आमदार महेश शिंदे व मा .आ .डॉ दिलीपराव येळगावकर यांचा कौल ही महत्वाचा ठरणार हे नक्की.परंतु त्यांनी अजून  आपली  भूमिका  उघड केली नाही.यामुळे जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघात अनेक घडामोडी घडणार असल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments